Pimpri: लोणावळा नगरपरिषदेचा १२९ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

लोणावळा : शहराच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. लोणावळा नगर परिषदेचा १२९ कोटी १९ लाख ९८ हजार ९५२ रुपयांचा २०२५-२०२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन व विकास योजनांना चालना देण्यात आली आहे, ज्यामुळे लोणावळा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी अशोक साबळे यांनी हा अर्थसंकल्प मंजूर केला आहे.
अर्थसंकल्पात शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या मालमत्ता तसेच शहरातील काही मुख्य ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
लोणावळा शहरातील डांबरी रस्त्यांसाठी तब्बल ७ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शहरातील सार्वजनिक सुविधा आणि संपर्क मार्गांमध्ये सुधारणा होणार आहे. भुयारी गटार योजना राबवण्यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शहराची स्वच्छता आणि आरोग्य सुविधा सुधारल्या जाणार आहेत.
स्विमिंग पूल परवाना शुल्क
महत्वाची बाब म्हणजे या वर्षात कोणतीही कर व दरवाढ करण्यात आलेली नाही, ज्यामुळे नागरिकांच्या आर्थिक भारात वाढ होणार नाही. मात्र या आर्थिक वर्षांपासून प्रथमच स्विमिंग पूल परवाना शुल्क पाच हजार रुपये आकारले जाणार आहे, ज्यामुळे शहरातील सुविधांचा वापर अधिक व्यवस्थित होईल.
अर्थसंकल्पातील मुख्य योजना व तरतूद
लोणावळा शहरातील वलवण तलाव विकास योजनेसाठी नवीन हेड तयार करण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर, लोणावळा नगर परिषदेच्या तुंगार्ली डॅम येथे मनोरंजन नगरी व विविध विकासकामांसाठी प्राथमिक खर्चासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ह्या कामामुळे लोणावळा शहर आणखीन आकर्षक बनण्यास मदत होईल.





