Pune District : कर्मयोगीच्या रणांगणात सहकार विरुद्ध खासगीकरणाची लढाई
Pune District : सहकाराचा वारसा की खासगीकरणाची वाट ? हे गणित आणखी सुटलेले दिसत नाही. कर्मयोगी कारखान्यावर सुमारे ६०० कोटी रुपयांच्या कर्जाची चर्चा होत असून, कामगारांचे प्रश्न, ऊसबिलांची थकबाकी आणि आगामी गळीत हंगामातील अनिश्चितता अशा अनेक मुद्द्यांनी कारखान्याला घेरले आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दि. १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, दि. १३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने केवळ २१ संचालक निवडण्याची प्रक्रिया पार पडणार नसून, सहकाराचा वारसा, शेतकऱ्यांचे हित, कारखान्याचे आर्थिक भवितव्य आणि इंदापूरच्या राजकारणातील नव्या समीकरणांचीही कसोटी लागणार आहे.
स्वर्गीय कर्मयोगी शंकररावभाऊ पाटील यांनी इंदापूरच्या शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना मिळावा, या दूरदृष्टीतून उभी केलेली संस्था आज कोणत्या वळणावर उभी आहे, हा प्रश्न सभासदांना अस्वस्थ करीत आहे. कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत, व्यवस्थापनाबाबत आणि खासगी व्यवस्थेकडे झालेल्या हस्तांतरणाबाबत शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारखाना सहकारातून उभा राहिला आणि त्याचे भवितव्य खासगी व्यवस्थेच्या हातात गेले, ही भावना अनेक सभासदांच्या मनात घर करीत असल्याने या निवडणुकीला भावनिक आणि राजकीय अधिष्ठान लाभले आहे.
सहकाराचा वारसा की खासगीकरणाची वाट ? हे गणित आणखी सुटलेले दिसत नाही. कर्मयोगी कारखान्यावर सुमारे ६०० कोटी रुपयांच्या कर्जाची चर्चा होत असून, कामगारांचे प्रश्न, ऊसबिलांची थकबाकी आणि आगामी गळीत हंगामातील अनिश्चितता अशा अनेक मुद्द्यांनी कारखान्याला घेरले आहे. या आर्थिक आकड्यांची अधिकृत स्थिती, कर्जाचे स्वरूप आणि कारखान्याच्या गळीत हंगामाबाबतचे चित्र स्पष्ट होणे आवश्यक आहे. दुसरीकडे, इतर साखर कारखाने गळीत हंगामाच्या तयारीला लागले असताना कर्मयोगीच्या भवितव्याबाबत मात्र सभासदांमध्ये संभ्रम कायम आहे.
ओंकार शुगरच्या खासगी व्यवस्थेकडे कारखाना गेल्याने सहकारी तत्त्वाचा मूळ उद्देश बाजूला पडल्याची टीका शेतकरी वर्गातून होत आहे. ‘कर्मयोगी पुन्हा सहकाराच्या मार्गावर आणायचा का?’ हा प्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे आहेत.
जगदाळे–शहा–भरणे यांची भूमिका निर्णायक ठरणार ?
मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या काळात जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढाकारातून भरत शहा आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात मनोमिलन घडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत शहा परिवाराची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी असलेली जवळीक आणि हर्षवर्धन पाटील यांच्याशी असलेले राजकीय-वैचारिक मतभेद लक्षात घेता, मागील निवडणुकीतील समीकरणांची पुनरावृत्ती होणार का? याबाबत उत्सुकता आहे. शहा परिवाराचे कर्मयोगी कारखान्याशी असलेले नाते स्थापनेपासूनचे आहे. संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी शंकरराव पाटील आणि संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांची जोडी कारखान्याच्या इतिहासात परिचित आहे. त्यानंतर मुकुंद शहा यांनी संचालक म्हणून, तर भरत शहा यांनी संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून संस्थेच्या कामकाजात योगदान दिले.
जिल्हा परिषद निवडणुकीचा पॅटर्न पुन्हा दिसणार ?
मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून यश मिळवले होते. हाच समन्वय कर्मयोगीच्या निवडणुकीत कायम राहणार की स्वतंत्र राजकीय वाटा निर्माण होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शहा, कारखान्याच्या माजी उपाध्यक्षा पद्माताई भोसले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या नेतृत्वाखाली सहकाराच्या मुद्द्यावर स्वतंत्र पॅनल उभे राहू शकते, अशी सभासदांमध्ये चर्चा आहे.
मयूरसिंह पाटलांच्या आवाहनाने चर्चेला धार
स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे पुतणे मयूरसिंह पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे सहकार वाचवण्यासाठी ऊस उत्पादक सभासदांनी पुढाकार घ्यावा आणि कारखान्याला विद्यमान नेतृत्वाच्या प्रभावातून मुक्त करावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे संघर्षाला नवी धार मिळाली आहे. सध्या कारखान्याचे अध्यक्षपद माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे असल्याने त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.





