Alephata : कांद्याची आवक घटली, तरी भावाची घसरण थांबेना
Alephata : आळेफाटा उपबाजारात मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असे आठवड्यातून तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात. त्यामुळे प्रत्येक लिलावाकडे शेतकर्यांचे लक्ष लागलेले असते. मात्र, सध्याच्या दरात उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी आणि साठवणुकीचा खर्च वजा केल्यानंतर शेतकर्यांच्या हातात किती रक्कम उरणार, हा प्रश्न कायम आहे.

आळेफाटा : कांद्याची आवक कमी होत असतानाही बाजारभावात अपेक्षित सुधारणा होत नसल्याचे चित्र आळेफाटा उपबाजारात दिसत आहे. काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर कांद्याच्या दरात पुन्हा नरमाई आली आहे. रविवारी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या गोळा कांद्याला प्रतिदहा किलोला कमाल 411 रुपये दर मिळाला. इतर प्रकारच्या कांद्याला तुलनेने कमी भाव मिळाल्याने शेतकर्यांची निराशा झाली आहे.
कांद्याच्या दरात तेजी येईल, या आशेने अनेक शेतकर्यांनी कांदा साठवून ठेवला होता. केंद्र सरकारच्या कांदा स्थिरीकरण निधीअंतर्गत खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारभावात सुधारणा झाली होती. ऑगस्टमध्ये कांद्याचे दर प्रतिदहा किलोला 400 रुपयांच्या पुढे गेले. काही काळ ते 500 रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यानंतर दर पुन्हा घसरू लागले.
गेल्या महिनाभरात आळेफाटा उपबाजारातील कांद्याची आवक सातत्याने कमी होत आहे. तरीही भावात ठोस सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आवक घटूनही दर का वाढत नाहीत, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत. रविवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या 6 हजार 357 गोणींची आवक झाली. जुन्नर, शिरूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर आणि अकोले परिसरातील शेतकरी कांदा विक्रीसाठी आळेफाटा बाजारात आणतात.
आळेफाटा उपबाजारात मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असे आठवड्यातून तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात. त्यामुळे प्रत्येक लिलावाकडे शेतकर्यांचे लक्ष लागलेले असते. मात्र, सध्याच्या दरात उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी आणि साठवणुकीचा खर्च वजा केल्यानंतर शेतकर्यांच्या हातात किती रक्कम उरणार, हा प्रश्न कायम आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रतिदहा किलोला 500 रुपयांपर्यंत पोहोचलेले दर आता पुन्हा 400 रुपयांच्या आसपास आले आहेत. आवक कमी होत असतानाही दरात तेजी नसल्याने कांदा उत्पादक चिंतेत आहेत. बाजारभावात पुन्हा सुधारणा होणार का, याकडे शेतकरी आणि व्यापार्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रुपेश कवडे आणि कार्यालय प्रमुख सतीश मस्करे यांनी कांद्याची आवक व बाजारभावाची माहिती दिली.
कांद्याचे बाजारभाव
गोळा कांदा : 380 ते 411 रुपये
सुपर कांदा : 350 ते 380 रुपये
गोल्टी व गोल्टा : 320 ते 350 रुपये
बदला/चिंगळी : 150 ते 250 रुपये
सर्व दर प्रतिदहा किलोसाठी आहेत.





