Manchar : मंचर बाजार समितीकडून शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत अपघात विमा
Manchar : या योजनेत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास विमा रकमेच्या १०० टक्के लाभ मिळणार आहे. अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व, जसे एक हात किंवा पाय गमावणे अथवा दृष्टी गमावणे, यासाठी विमा रकमेच्या ५० टक्के लाभ मिळणार आहे.

मंचर : कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या वतीने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीच्या मुख्य बाजार आवार व उपबाजार आवारात दि. १ एप्रिल २०२६ नंतर शेतमाल घेऊन येणारे आणि योजनेसाठी नोंदणी केलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. सद्यस्थितीत अपघात विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अशी माहिती सभापती निलेश थोरात यांनी दिली.
या योजनेत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास विमा रकमेच्या १०० टक्के लाभ मिळणार आहे. अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व, जसे एक हात किंवा पाय गमावणे अथवा दृष्टी गमावणे, यासाठी विमा रकमेच्या ५० टक्के लाभ मिळणार आहे. योजनेसाठी शेतकऱ्यांचे वय १८ ते ७० वर्षे असणे आवश्यक आहे. विमा नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी अॅग्रीक्स भ्रमणध्वनी अनुप्रयोग डाउनलोड करून बाजार समितीत नोंद असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकाने प्रवेश करावा.
त्यानंतर स्वतःची ओळख पडताळणी करून विमा अर्ज करता येणार आहे. ओळख पडताळणीसाठी आधार क्रमांक व त्याला जोडलेला भ्रमणध्वनी जवळ ठेवावा.अडचण आल्यास अनुप्रयोगातील मदत विभागाचा वापर करता येईल.सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे व संचालक मंडळाने शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला बाजार समितीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अपघाताच्या प्रसंगी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने दोन लाखांपर्यंतची विमा योजना सुरू केली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याने नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा.
– सचिन बोऱ्हाडे, सचिव, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती.शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत येताना अपघाताचा धोका असतो. अशा वेळी दोन लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणे शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरणार आहे बाजार समितीचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे.
– अशोकराव बाजारे, शेतकरी, सातगाव पठार.





