नोंद : अमेरिकन निवडणुकीची दिशा बदलली…

अख्ख्या जगाचे लक्ष अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण एका घटनेमुळे निवडणुकीची दिशा बदलली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान अध्यक्ष बायडेन यांच्यात आता प्रारंभिक फेर्या सुरू झाल्या होत्या. वादविवाद पातळीवर दोघे समोरासमोर यायला अजून वेळ आहे. मतकौल पाहता दोघांत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यातच एका प्रचार रॅलीत ट्रम्प यांच्यावर एका माथेफिरूने गोळीबार केला. मात्र त्यांना गंभीर काही झाले नाही. गोळीबारानंतर त्यांनी दाखवलेला लढावूबाणा अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची दिशा बदलणार असून, बायडेन यांना आता निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे. कदाचित ते माघारही घेतील.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आता जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या चित्राचा नेहमीच उल्लेख होईल. गोळी लागल्यावर त्यांच्या कानापासून चेहर्यापर्यंत रक्त वाहत असताना ते हात वर करून उभे आहेत आणि अमेरिकेचा झेंडा त्यांच्या हातात आहे. काही क्षणापूर्वीच घाबरलेल्या समर्थकांना ट्रम्प यांच्या तोंडून ‘लढा, लढा, लढा’ असे तीन शब्द ऐकून त्यांच्यात नवीन ऊर्जा भरली. यापूर्वी ट्रम्प अनेक कारणांनी वादग्रस्त ठरले. गेल्या वेळी त्यांनी पराभूत होत असताना दंगल घडवून आणली. बायडेन यांना विजयाचा निर्भेळ आनंद मिळू द्यायचा नाही, असा प्रयत्न त्यांनी केला. काही व्यक्तिगत प्रकरणे दडपण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न, त्यांना झालेली शिक्षा या सर्व बाबींवर आताच्या गोळीबाराच्या घटनेने पाणी फेरले आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये घडलेल्या घटनेने अमेरिकन लोकांना ट्रम्प यांची भुरळ पडली आहे.
अध्यक्षीय निवडणुकीशी संबंधित प्रचारादरम्यान ही घटना घडली. गुप्त सेवा एजंट्सच्या उपस्थितीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना घडलेल्या या घटनेने अमेरिकन जनतेला एक संदेश दिला, की देशाचे माजी अध्यक्षदेखील हिंसेपासून वाचू शकत नाहीत. ही हिंसा अमेरिकेच्या दैनंदिन जीवनात कधीही होऊ शकते. इतकेच नाही, तर अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील एक नाट्यमय क्षण म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या वेळची अध्यक्षपदाची निवडणूक आणि भविष्यातील निवडणुकीदरम्यान व्हिडिओ क्लिप, छायाचित्रे आणि साक्षीदारांच्या निवेदनाद्वारे ती कायम लक्षात ठेवली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्रांनी अमेरिकन वृत्तपत्रांचे मथळे तयार झाले. ऑफिसमधून केलेल्या भाषणात बायडेन यांनी अमेरिकन लोकांना निवडणुकीच्या चर्चेदरम्यान आपला संयम गमावू नका, असे सांगितले. अमेरिका कधीही युद्धभूमी बनू नये. कधीही हिंसाचाराचा अवलंब करू नये, असे आवाहन त्यांनी केले. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांनी डेमोक्रॅट आणि बायडेन यांच्यावर टीका केली आहे.
डेमोक्रॅट्सचा सामना करताना, ट्रम्प यांच्या मुलाने एका टीव्ही मुलाखतीत सांगितले, ‘त्यांना हेच घडवायचे हवे होते.’ कथित खुनी थॉमस मॅथ्यू क्रुक्सचा राजकीय कल काय होता आणि त्याचा हेतू काय होता हे अद्याप कळू शकलेले नाही. वॉशिंग्टनमधील यूएस कॅपिटल हिंसाचाराच्या घटनेसाठी आता कोणीही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे बोट दाखवणार नाही. ही हिंसक घटना 1 जानेवारी 2020 रोजी घडली. तेव्हा ट्रम्प यांनी निवडणूक निकालांना आव्हान देणार्या रॅलीला संबोधित केले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थक जमावाने कॅपिटल हिल परिसरात हल्ला केला आणि त्यादरम्यान पोलिसांशी झटापट झाली. या घटनेचा परिणाम असा झाला, की लोकप्रतिनिधी सभागृहात त्यांच्याविरुद्ध महाभियोग सुरू झाला. त्यानंतर वर्षभरानंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची व्याप्ती वाढली.
यूएस कॅपिटल हिंसाचार प्रकरणात डेमोक्रॅट्स ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत; परंतु पेनसिल्व्हेनियामध्ये ज्या पद्धतीने गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टीकेची धार बोथट होऊ शकते. पेनसिल्व्हेनियामधील घडामोडी वेगळ्या प्रकारच्या राजकारणाला जन्म देऊ शकतात. बायडेन यांना पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष व्हायचे आहे; परंतु त्यांना माघार घ्यावीच लागेल अशी शुक्रवारपर्यंतची स्थिती होती. बायडेन यांचे वय आणि त्यांची क्षमता यावर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या जागी अन्य उमेदवार दिला तरी त्याच्यासाठी जिंकणे अवघड आहे. पेनसिल्व्हेनियामधला हल्ला आणि त्यानंतर ट्रम्प ज्या पद्धतीने धीरोदात्तपणे वागले, ते रिपब्लिकनांना त्यांच्या नेत्याचे वेगळे चित्र आगामी काळात मांडण्यास मदत करेल. यामुळे डेमोक्रॅट्सनाही आपली रणनीती बदलावी लागू शकते. पेनसिल्व्हेनियामध्ये जे घडले, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे अपेक्षा आणि राजकीय कथा काही सेकंदात बदलू शकतात.
ट्रम्प चेहर्यावर रक्त घेऊन मंचावरून खाली उतरलेले, हवेत मुठी फिरवत आणि गुप्तहेर खात्याच्या अधिकार्यांची मदत या विलक्षण चित्राने अमेरिकेत इतिहासच घडवला नाही, तर नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीची दिशाही बदलून टाकली. त्यांचे भाषण पुढेही प्रत्येक अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये इतिहासातील दाखले म्हणून दिले जाणार आहेत. बायडेन यांच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने सध्या सर्व राजकीय विधानांना विराम दिला आहे आणि शक्य तितक्या लवकर त्यांच्या जाहिराती काढून टाकत आहेत. ट्रम्प यांच्यावर राजकीय हल्ला करणे तोट्याचे आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर या घटनेचा निषेध करण्यावर त्यांचा भर आहे. अमेरिकेतील सर्व राजकीय पक्षांचे नेते, ज्यांचे इतर कोणत्याही गोष्टीवर एकमत होणार नाही, ते सध्या लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, असे म्हणत आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल क्लिंटन यांनी तत्काळ या घटनेचा निषेध केला. ट्रम्प यांच्या जवळचे काही मित्र आणि समर्थक या हिंसाचारासाठी अध्यक्ष बायडेन यांना जबाबदार धरत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याने सोशल मीडिया आणि एक्सवर एका पोस्टमध्ये बायडेन यांच्यावर हत्येला चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे.
सिनेटर जेडी वान्स म्हणाले, की बायडेन यांच्या निवडणूक प्रचारातील वक्तृत्वामुळे ही घटना थेट घडली. वान्स हे ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. राजकीय विरोधक बायडेन यांच्यावर अमेरिकन राजकारण पेटवल्याचा आरोप करून त्यांचा निषेध करीत आहेत. अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक चुरशीची लढत ठरू शकते आणि भविष्यात निवडणूक प्रचाराला नवा रंग मिळू शकतो. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने अमेरिकी निवडणुकीची दिशाच बदलली आहे.





