Border–Gavaskar Trophy 2024-25 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आमच्यासाठी ॲशेसइतकीच महत्त्वाची; ‘या’ स्टार क्रिकेटरचे मोठे वक्तव्य…

Border–Gavaskar Trophy 2024-25 : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी असे नाव दिल्यापासून तीन दशकांतील ही पहिलीच वेळ आहे की दोन्ही संघ पाच सामन्यांची मालिका खेळणार आहेत. त्यामुळे ही मालिका अधिक महत्त्वाची आणि रोमांचक बनली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या महत्त्वाच्या मालिकेत 1991-92 नंतर प्रथमच पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
दरम्यान, “भारताविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ इंग्लंडविरुद्धच्या ॲशेस ट्रॉफीइतकीच महत्त्वाची असल्याचं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं म्हटलं आहे. स्टार्कने वाइड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, ‘यावेळी ही पाच सामन्यांची मालिका असेल, ज्यामुळे ती ॲशेस मालिकेइतकीच महत्त्वाची आहे.’
ऑस्ट्रेलियाने 2014-15 पासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकलेली नाही, तर भारताने यादरम्यान सलग चार मालिका जिंकल्या आहेत. या कालावधीत भारताने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या भूमीवर दोनदा पराभव केला.
प्रत्येक सामना जिंकायचा आहे…
स्टार्कचा केवळ मालिका जिंकण्याचाच इरादा नाही तर त्याच्या संघाने क्लीन स्वीप करावे अशी त्याची इच्छा आहे, विशेषत: ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. तो म्हणाला की, ‘आम्हाला आमच्या मायभूमीवर प्रत्येक सामना जिंकायचा आहे आणि आम्हाला हे देखील माहित आहे की भारत हा खूप मजबूत संघ आहे.’
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये भारत सध्या पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. स्टार्क म्हणाला की, ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी आणि अर्थातच खेळाडूंसाठी ही अतिशय रोमांचक मालिका असणार आहे. आशा आहे की 8 जानेवारीला ट्रॉफी आमच्या हातात असेल.’
तो दिवस माझ्यासाठी नक्कीच खूप खास असेल…
स्टार्क 100 कसोटी सामने खेळण्यापासून फक्त 11 सामने दूर आहे आणि डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाची अद्याप दीर्घकालीन फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याची कोणतीही योजना नाही. तो म्हणाला, ‘जेव्हा-जेव्हा मला बॅगी ग्रीन कॅप घालण्याची संधी मिळते तेव्हा तो क्षण खूप खास वाटतो. आशा आहे की, ‘आम्ही उन्हाळी सत्रातील पाचही कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी होऊ. 100 कसोटी सामने खेळण्याचा प्रश्न आहे, तो दिवस माझ्यासाठी नक्कीच खूप खास असेल.’
कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राधान्य …
स्टार्क पुढील महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे आणि त्यानंतर तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तयारीसाठी न्यू साउथ वेल्सकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. तो म्हणाला, ‘माझ्यासाठी कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आगामी हंगामात आम्हाला सात कसोटी सामने खेळायचे आहेत. यातील पाच भारताविरुद्ध तर दोन श्रीलंकेविरुद्ध होणार आहेत. आमच्यासाठी या सामन्यांना प्राधान्य आहे. सध्या आम्ही सर्वजण भारताविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करत आहोत.’





