Pune | मार्केट यार्डात द्राक्षांची आवक सुरू

पुणे, – गोड, आंबट चवीचे द्राक्ष म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा द्राक्षांची हंगामपूर्व आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. त्यामुळे द्राक्षांच्या हंगामापूर्वीच पुणेकरांना चव चाखता येणार आहे. घाऊक बाजारात 9 किलोच्या कॅरेटला 900 ते 1000 रुपये भाव मिळत आहे. दररोज अंदाजे दीड ते दोन टन द्राक्षांची आवक होत आहे.
मागील वर्षीही याच वेळी द्राक्षाची आवक सुरू झाली होती. मागील दोन वर्षांत हवामान बिडाघाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. जिल्ह्यातील बारामती आणि सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून द्राक्षे बाजारात दाखल होत आहे. घाऊक बाजारात द्राक्षाच्या 9 किलोच्या कॅरेटला 900 ते 1000 रुपये, तर 5 किलोच्या निवडक मालाला 600 ते 800 रुपये भाव मिळत आहे. साधारणपणे 15 डिसेंबर ते एप्रिल अखेरपर्यंत द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात काही शेतकरी आधीच माल बाजारात आणत असतात. तशी आवक सुरू झाली आहे.
बाजारात दाखल झालेल्या मालाची महाबळेश्वर, लोणावळा या पर्यटन क्षेत्रातील विक्रेते आणि गुजरात, अहमदाबाद येथील व्यापार्यांनी खरेदी केली. पोषक वातावरणामुळे दर्जा चांगला आहे. पीकही चांगले आहे. हळूहळू आवक वाढत जाणार आहे. सुरूवातीलाच मागील वर्षीपेक्षा वीस टक्के जास्त भाव मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दर्जेदार मालाची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात सुरू झाली आहे. द्राक्षाला यंदा पोषक वातावरण आहे. द्राक्षांना चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदा जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे.
– अरविंद मोरे, द्राक्षांचे व्यापारी, मार्केट यार्ड.




