प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीतील पक्षांमध्ये मतभेद उफाळल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपने जिल्हास्तरावर “स्वबळाचा नारा” दिल्यानंतर मंचरमध्ये युतीची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतंत्र उमेदवारांसह मैदानात उतरले आहे. राज्यात आणि देशात सत्तेत असलेल्या महायुतीतील एकत्रित शक्ती मंचरमध्ये मात्र तुटल्याचे चित्र दिसत आहे. भाजपने सर्वच ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने मंचर नगरपंचायतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत, तर एकनाथ शिंदे गटानेही “राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही” असा स्पष्ट पवित्रा घेत आपली स्वतंत्र रणनिती आखली आहे. मंचर नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्व पक्ष प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून लढत आहेत. स्थानिक स्तरावर पॅनेल तयार करण्याची चाचपणी सुरू असून तिन्ही पक्षांमध्ये अटीतटीची चुरस रंगणार हे निश्चित झाले आहे. या त्रिकोणी लढतीमुळे मतदारसंघात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. “मंचर नगरपंचायतीची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी तयारीला लागले आहेत.” -संजय थोरात, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप.