Baneshwar : बनेश्वर स्मशानभूमीतील गॅस दाहिनी धूळखात
लाखो रुपये खर्चून उभारलेली सुविधा अनेक महिन्यांपासून बंद

– मनोहर दाभाडे
तळेगाव दाभाडे- अंत्यसंस्काराचा खर्च कमी करण्यासह पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या पुढाकारातून बनेश्वर स्मशानभूमी उभारण्यात आली. मात्र याठिकाणी असलेली गॅस दाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. लाखो रुपये खर्च करून उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा नागरिकांना लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देणारी ही गॅस दाहिनी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तळेगाव दाभाडे शहराचे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे.
स्मशानभूमीत उपलब्ध असलेल्या जागेवर काही वेळा एकाच वेळी अनेक अंत्यसंस्कार करावे लागतात. अशा वेळी पारंपरिक पद्धतीने अग्निदहन करण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे नागरिकांच्या बसण्याच्या जागेतही अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कारासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक बनले आहे.
रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीतून लाखो रुपये खर्च करून गॅस दाहिनीची सुविधा उभारली. मात्र, ही सुविधा अनेक महिन्यांपासून बंद असल्याने तिचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन उपलब्ध करून दिलेली सुविधा वापराविना पडून राहणे ही खेदाची बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून स्मशानभूमीतील सुविधांमध्ये वाढ करणे आणि उपलब्ध सुविधांचा योग्य वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बनेश्वर स्मशानभूमीतील गॅस दाहिनी तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आर्थिक दुर्बल कुटुंबांना मिळू शकतो दिलासा
सध्याच्या काळात अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत गॅस दाहिनी सुरू झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय लाकडाची बचत, पर्यावरणाचे संरक्षण आणि अंत्यसंस्कारासाठी लागणारा वेळ कमी करणे असेही फायदे मिळू शकतात.
रोटरी क्लबने सामाजिक हिताच्या भावनेतून उभारलेली ही सुविधा केवळ नावापुरती न राहता तिचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने गॅस दाहिनी बंद असण्याची कारणे तपासून आवश्यक दुरुस्ती, देखभाल आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करावी. तसेच ती नियमितपणे कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा:




