भुईंजमध्ये वार्षिक यात्रा उत्साहात सुरू

भुईंज -येथील श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व दसरा उत्सव समितीच्यावतीने सोमवारी दि.26 रोजी घटस्थापना होऊन 5 ऑक्टोबरपर्यंत येथे विजयादशमी वार्षिक यात्रा होणार आहे. करोनानंतर प्रथमच यात्रा उत्सव मोठया उत्साहात सुरू झाला आहे. शारदीय नवरात्रोत्सव व भुईंजचा यात्रा उत्सव परंपरा जपत सोहळा साजरा होतो. सोहळयाला उत्साहात सुरूवात झालेली असून तालुक्याच्या पूर्व भागातून भाविकांची विशेषतः महिलांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे.
चांदीच्या प्रभावळीत विराजमान झालेली देवी महालक्ष्मीची उत्सवमूर्ती भाविकांचे आकर्षण झाले आहे. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर देखणे बांधीव घाट व शेजारी असणारी महर्षी आचार्य भृगुऋुषी यांची समाधी व त्यांचीच कन्या असणारी देवी महालक्ष्मीचे पुरातन मंदिर हे या परिसराच वैभव मानले जाते. पूर्वाभिमुख मंदिऱ दर्शन मंडप, गाभारा व ऐश्वर्याची उधळण करणारी देवीची प्रसन्न मूर्ती भाविकांची दर्शनातूनच इच्छापुर्ती करते, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी जिल्हाभरातून भाविकांची गर्दी होत असते.
घटस्थापनेपासून या शारदीय नवरात्रोत्सव व यात्रा उत्सव सोहळ्याला सुरूवात झाली. रोज पहाटे सनई चौघडा व नगारा वाजवून ब्रम्हमुहर्तावर देवीची शोडोष्पचार पूजा व आरती होते. देवीचे व्रत करणाऱ्या महिला व पुरूष आरतीसाठी रोज गर्दी करतात. विविध आसनावर व विविध रूपांत विराजमान होणारी महालक्ष्मी भक्तांना रोज वेगवेगळया रूपांमधून दर्शन देते.
याच काळात सुवर्ण अलंकाराने विशेषतः हिरे, रत्न, माणके यांनी सजवलेली देवीची चांदीची उत्सव मूर्ती चांदीच्या पालखीतून मिरवणूकीने मंदिरात विराजमान होते. रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई व पानाफुलांची तोरणे, दारातील रांगोळया यांनी वातावरण मंगलमय होते. धार्मिक, पौराणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन केले जाते.
मुख्य यात्रेच्या दिवशी सांयकाळी चार वाजता सीमोलंघनाची मिरवणूक लक्षवेधी ठरते. पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेला निघतो. तसेच रात्री निघणारा छबिना पारंपारिक वाद्यांचा गजर फटाक्यांची भव्य आतिषबाजी पहाटेपर्यंत मिरवणूक होत असते. याकाळात गावच्या माहेरवाशिणींसह राज्यभरातील भक्तगण हजेरी लावतात, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर भोसले, मार्गदर्शक गजानन भोसले व सचिव चंद्रकांत केसरकर यांनी दिली.
असे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम
मंगळवार दि. 27 रोजी रजत मूर्तीचे आगमन आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धा, बुधवार दि. 28 रोजी महादांडिया स्पर्धा महिलांसाठी फक्त व शिवाजी मैदान येथे लावण्यांचा कार्यक्रम. गुरूवार दि. 29 रोजी होम मिनिस्टर कार्यक्रम अभिनेत्री अश्विनी महांगडेयांची उपस्थिती. शुक्रवार दि. 30 रोजी महिलांसाठी सहस्त्रनाम स्त्रोत्राचे पठण व हळदी कुंकू कार्यक्रम. शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी बावधनच्या शिवमल्हार जागरण पार्टींची देवाची गाणी अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर रविवार दि. 2 रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पधार्, सायकांळी सहा वाजता मुंबईच्या ओमकार म्युझिकल ग्रुप प्रस्तुत भक्ती गीतांचा कार्यकम. सोमवारी कबड्डी स्पर्धा. बुधवार दि. 5 रोजी सीमोलंघन व रात्री वाद्याच्या गजरात छबिना या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.





