विधानसभेसाठी लंघेंचे भाजपमधून शिवसेनेत सीमोल्लंघन? नेवाशात राजकीय चर्चांना जोर

नेवासा – नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे-पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, ही उमेदवारी त्यांना भाजपाकडून नव्हे, तर शिवसेनेकडून मिळू शकते अशाही चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चा खऱ्या ठरल्यास लवकरच लंघे यांना भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करावा लागेल.
महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर या संदर्भात चर्चा सुरू आहेत, आणि लवकरच या बाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुका होताच विधानसभेला नेवासा मतदारसंघाची जागा महायुतीतून नेमकी शिवसेनेकडे जाईल की भाजपाकडे, आणि कोणाला तिकीट मिळेल, याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असून, विठ्ठलराव लंघे-पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईत या विषयावर महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा चालू आहेत.
या घडामोडींमुळे नेवासातील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे. लंघे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास स्थानिक राजकारणात मोठे बदल होऊ शकतात.





