नेवासा : नेवासा शहरातील अहिल्यानगर येथील मदिना मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मौलाना जुनेद यांनी सांगितले की, “पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याचा आम्ही सर्व मुस्लिम बांधव तीव्र निषेध करतो. इस्लाम धर्म नाहक हत्या माफ करत नाही, हे पाप आहे. या कृत्यात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे हल्ले करण्याची कोणाची हिंम्मत होणार नाही. या संकटाचा मुकाबला सर्वांनी एकजुटीने करणे गरजेचे आहे. आम्ही सर्वधर्मीय बांधवांसोबत आहोत.” या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक शरीफ भाई, निजाम शेख, रहीम शेख, आसिफ शेख, सुलेमान मामू, इकबाल खान यांच्यासह परिसरातील अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन मृतांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केली आणि अशा घटनांच्या विरोधात एकजुटीचे आवाहन केले.