सरपंच गांजाळे यांच्या आरोपांचे खासगी डॉक्टरांकडून खंडन
मंचर -मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर आणि परिसरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर केलेले आरोप तथ्यहीन आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये गैरसमज होऊ शकतो.असे मत आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील खिंवसरा आणि कार्याध्यक्ष डॉ. सुहास कहडणे यांनी व्यक्त केले. याबाबत तहसीलदार रमा जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांना आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशने निवदेन दिले आहे.
सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही खासगी डॉक्टरांवर बेछूट आरोप केले आहेत. कारण हा विषय हा डेंग्यू व डेंग्यूसदृश या आजाराविषयी आहे. असोसिएशनचे खासगी वैद्यकीय व्यावसायिक हे ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय क्षेत्राच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार उपचार करत आहेत. त्यामुळे डेंग्यू व डेंग्यूसदृश्य तापाच्या रुग्णांची स्थानिक पातळीवरती उपचारांची उत्तम सोय झालेली आहे.
रॅपिड किट तपासणी ही डेंग्यूची प्राथमिक रुग्ण निदान चाचणी आहे. ही तपासणी रुग्णाला आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर पहिल्या दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत पॉझिटिव्ह येते. मंचर सारख्या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीमध्ये उपचार देण्याचे काम आंबेगाव तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिक अत्यंत माफक दरात करत असतात, तसे असतानाही कमीत कमी केलेल्या बिलात रुग्ण व रुग्णाच्या नातेवाइर्खकांना सवलत हवी असते.
यातून कित्येकदा गैरसमज निर्माण होत असतात. हॉस्पिटलला संलग्न असलेल्या मेडिकल स्टोअरमधून औषधे घेणे किंवा संलग्नित असणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबमधून चाचण्या करण्याचे कोणतेही बंधन रुग्णांवर केले जात नाही. आंबेगाव तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा रुग्णांवर दिवस-रात्र सेवा करुन उपचार केले.
या बाबीची चांगल्या दृष्टिकोनातून दखल न घेता आमच्याशी कुठलीही चर्चा न करता तसेच शास्त्रीय माहिती न घेता सरपंच गांजाळे यांनी मंचर मधील खासगी डॉक्टरांवर एकतर्फी आरोप केलेले आहेत, असे मत आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.सुहास कहडणे यांनी व्यक्त केले.
या प्रकरणामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खचून त्याचा परिणाम तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो. रुग्ण आणि ग्रामस्थांच्या हितासाठी आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन नेहमी प्रयत्नशील आहे. व्यवसाय म्हणून न पाहता सेवाभावी पद्धतीने वैद्यकीय उपचार करुन सेवाभाव जपला आहे, असे मत आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे कार्यकारी समिती अध्यक्ष डॉ. संतोष शिंदे यांनी सांगितले.