सातारा | खंबाटकी घाटातील तेलगळतीमुळे प्रशासनाची धावपळ दुचाकी घसरल्या; पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे वाहतूक पूर्ववत

खंडाळा – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतुकीला शनिवार, रविवार आले की जणू ग्रहण लागते. या घाटात शनिवारी पहाटे एका टँकरमधून तेल सांडल्याने रस्त्यावरून 30 ते 40 दुचाकी घसरल्या. रस्ता वाहतुकीस योग्य करण्यासाठी पोलिसांना दिवसभर शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
याबाबत माहिती अशी, खंबाटकी घाटात भैरवनाथ मंदिर परिसरात शनिवारी पहाटे एका टँकरमधून मोठ्या प्रमाणावर तेल रस्त्यावर सांडले. त्यामुळे रस्त्यावरून 30 ते 40 दुचाकी घसरून, किरकोळ अपघात झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. आणखी अपघात होऊ नयेत, यासाठी महामार्ग पोलीस दल, खंडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमने पहाटेपासून दुपारपर्यंत प्रयत्न केले. ट्रॅक्टरमधून माती आणून, ती जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पसरण्यात आली. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी योग्य झाला. या ठिकाणी गंभीर अपघात होऊ नये, म्हणून पोलिसांनी भर पावसात केलेल्या प्रयत्नांचे प्रवाशांनी कौतुक केले.





