Nagar | जिल्हा रुग्णालयातून पसार झालेला आरोपी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी)- वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी जिल्ह्या रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्याला रविवारी (दि. ११) रोजी कल्याण येथून ताब्यात घेण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. किरण बबन कोळपे, (रा विळद ता नगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी अॅड नाजमीन वजीर बागवान यांच्या घरात आरोपी किरण कोळपे याने गुरुवारी (दि ८) अनाधिकृत पणे प्रवेश करुन त्याचे विरोधात २०२३ मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हयातील दाखल वकिल पत्र व सदर गुन्ह्यात त्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
त्या गुन्ह्याचे कागदपत्र व घरातील ठेवलेले १ लाख ९२ हजार ७०० रुपये असा ऐवज चोरुन नेला असे फिर्यादीत म्हटले होते.
याबाबत कोतवाली पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करता नेले होते. आरोपीने येथून पळ काढला. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कोळपे हा कल्याण येथील विठ्ठलवाडी येथे असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने आरोपीस सापळा रचवून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उप निरिक्षक प्रविण पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, पोहेकाँ विशाल दळवी, पोना सलीम शेख, पोना याकुब सय्यद, अभय कदम, अमोल गाढे, व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.





