अव्यवहार्य “एचसीएमटीआर’ रद्द करावा

नागरिक कृती समितीची मागणी
पुणे – उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. त्यामुळे प्रकल्पच रद्द करण्याची मागणी “एचसीएमटीआर’ नागरिक कृती समितीने महापालिका आयुक्तांकडे पत्रकाद्वारे केली आहे.
या समितीमध्ये डॉ. सुषमा दाते, सारंग यादवाडकर, प्राजक्ता दिवेकर, सुमिता काळे, पुष्कर कुलकर्णी, रवी सिन्हा, कनिझ सुखरानी, गौरी मेहेंदळे, वैशाली पाटकर, हेमा चारी, आशुतोष प्रधान, नरेंद्र थत्ते यांचा समावेश आहे.
“एचसीएमटीआर’ प्रकल्पाला राज्य सरकारने निधी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच फेब्रुवारी 2019 मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ती अवैध आहे. महापालिकेकडून सातत्याने या प्रकल्पाच्या खर्चाबद्दल नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे, असे समितीचे म्हणणे आहे.
5,192 कोटी रुपये खर्चाचा अंदाज होता. हा प्रकल्प मंजूर आलेल्या निविदेद्वारे 40 टक्क्यांनी वाढून 7,535 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आला आहे. मार्गावरील प्रस्तावित सुविधांचा खर्च, तसेच भूसंपादनाचा योग्य खर्च अंदाजामध्ये विचारात घेतलेला नाही. तो गृहीत धरला असता तर हा प्रकल्पाचा अंदाज खर्च 8,572 कोटी रुपयांच्याही वर जातो, असे या समितीचे म्हणणे आहे.
महापालिकेने भूसंपादनाचा गृहीत धरलेला खर्चदेखील अंदाजापेक्षा बराच कमीच होता असे लक्षात येते. भूसंपादनासाठी गृहीत धरलेला खर्च अत्यंत अव्यवहार्य होता. भूसंपादनात मोबदला, नुकसानभरपाई आणि दिलाशापोटी द्यावयाची रक्कम कायद्यान्वये अनिवार्य आहे, अशा अनेक बाबींचे स्पष्टीकरण महापालिकेने दिलेले नाही, असे समितीने म्हटले आहे.





