माळेगाव कारखान्याची 70 वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थ मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी व्हाईस चेअरमन संगिता कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील, जेष्ठ संचालक बाळासाहेब तावरे योगेश जगताप, स्वप्नील जगताप,विरोधी संचालक चंद्रराव तावरे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला मृत्यू पावलेले कारखान्याचे सभासद,कामगार, शास्त्रज्ञ व देशासाठी शहीद झालेले जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच एकरी १०० टन ऊस उत्पादन केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. सभेच्या प्रारंभी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले.अहवाल वाचन जवाहर सस्ते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी तर आभार संचालक नितीन शेंडे यांनी मानले.
सभेत बोलताना चेअरमन अजित पवार म्हणाले की, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळेल. या प्रकल्पासाठी ७१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील १८ कोटी स्वनिधीतून तर उर्वरित ५४ कोटी कर्जाद्वारे उभारले जाणार आहेत. हा प्रकल्प एका वर्षात पूर्ण होऊन दोन वर्षांत कर्जमुक्त होईल. दररोज १५ टन बायोगॅस निर्मिती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळातील भ्रष्टाचारावर अप्रत्यक्षपणे टीका करत, मागील काही चेअरमनच्या कारभारावर बोट ठेवले. संस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जिथे वळण आहे किंवा डावा कालवा फुटण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी अस्तरीकरण करण्यात येईल, अशी माहिती दिली.सभेच्या दरम्यान जेष्ठ विरोधी संचालक चंद्रराव तावरे, दशरथ राऊत, युवराज तावरे, प्रा. ज्ञानदेव बुरुंगले, अरविंद बनसोडे, विक्रम कोकरे, राजेश देवकाते, अशोक तावरे, प्रकाश सोरटे आदी सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले.





