‘सह्याद्री’ची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

यशवंतनगर (वार्ताहर) : सहकारी साखर कारखान्यांनी रस्ते करायचे, पाणीपुरवठा संस्था निर्माण करायच्या आणि ऊस मात्र खासगी कारखान्याला घालायचा, ही गंभीर बाब आहे. सहकारी कारखान्याकडे ऊस येण्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्व सभासद, ऊस उत्पादकांचा सर्व ऊस नेण्याची जबाबदारी सहकारी साखर कारखाना पार पाडत असतो. दरम्यान, या सरकारने अजून तरी मंत्री समितीची बैठक घेतलेली नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीचे धोरण अद्याप ठरलेले नाही. सह्याद्रि कारखान्याने ऊस विकास कार्यक्रम आणि राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे कारखान्यास विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल अनेक सभासदांनी कारखान्याचे अभिनंदन केले असल्याचे आ. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर होऊन चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत सभासद, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आ. मोहनराव कदम, कारखान्याचे संचालक जशराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड तालुकाध्यक्ष देवराज पाटील, माजी शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, माणिकराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, व्हा. चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, देशामध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा देशपातळीवरील व्दितीय क्रमांकांचा पुरस्कार सह्याद्रि कारखान्याला सलग चौथ्यांदा प्राप्त झाला मिळाला. कारखान्यालगत असणाऱ्या 33 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन केले जात असून धनगरवाडी-हणबरवाडी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने हणबरवाडी-शहापूर योजना सुरु झाली आहे. सभासदांच्या मागणीनुसार साखर घेण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा देण्यात येणार आहे. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन व मागील सभेचे प्रोसिडिंग भास्कर कुंभार यांनी वाचून कायम केले. संचालक मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले.
ऊस तोडीस पैसे देऊ नका
सभेत ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी सभासदांनी उपस्थित केल्या. त्यावर आ. पाटील यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती असून सह्याद्रिच्या क्षेत्रात असे कुठे घडत असल्यास सर्व गावाने एकत्र येऊन पैसे न देण्याचा एकमुखी ठराव करावा. उसाच्या बाबतीत कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत सभासद, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दिवाळी गोड करण्याची सभासदांकडून मागणी
सह्याद्रि कारखाना उस दराबाबत नेहमीच अग्रेसर राहिला असून कारखान्याने सभासदांसाठी हॉस्पिटल उभारावे. तसेच सभासदांना दिवाळीच्या आगोदर काहीतरी रक्कम देऊन सभासदांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी सभासदांनी केली.





