मुंबई : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू यांची युती झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी हे दोन्ही बंधू एकत्र सभा घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून कोण कोणाविरुद्ध लढणार आहे, हे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. आता ठाकरे बंधूंनीही जय्यत तयारी केली आहे. ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ते वचननामा याचा संपूर्ण कार्यक्रम तयार झाला आहे. ठाकरे बंधू केवळ मुंबईतच नाही तर ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथेही संयुक्त सभा घेणार आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडवून देण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 4 जानेवारीला संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते आपला वचननामा प्रकाशित करणार आहेत. वचननाम्यानंतर ठाकरे बंधू प्रचाराच्या मैदानात उतरतील. त्यांची पहिली संयुक्त जाहीर सभा ही मुंबईत होणार आहे. पाच जानेवारीला ही सभा मुंबईच्या पूर्व उपनगरात होणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संबोधित करतील. या सभेद्वारेच ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या तीन संयुक्त सभा होणार आहेत. त्यात एक सभा ही पूर्व उपनगरात होणार आहे. तर दुसरी सभा ही पश्चिम उपनगरात होणार आहे. तिसरी सभा ही मुंबई शहरात होईल. या सभेद्वारे प्रचाराची सांगता होईल असे सांगितले जात आहे. हा कार्यक्रम निश्चित होण्याआधी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यात प्रचारसभा, वचननामा याबाबत रणनिती ठरल्याचे सांगितले जात आहे.