पुण्यात 16 जानेवारीपासून 24 व्या ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2026’चे आयोजन; 400 हून अधिक गृहप्रकल्पांची मेजवानी

पुणे – क्रेडाई पुणे यांच्या वार्षिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचा 24 वा आवृत्ती असलेला ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2026’ दि. 16 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान अॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यात 85 हून अधिक विश्वासार्ह विकासक सहभागी होणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए परिसरातील 400 पेक्षा अधिक रेरा-नोंदणीकृत प्रकल्प येथे सादर करण्यात येणार आहेत.
‘पूना टू पुणे’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात शहराचा ऐतिहासिक प्रवास आणि भविष्योन्मुख, शाश्वत विकास अधोरेखित केला जाणार आहे. या एक्स्पोचे उद्घाटन दि. 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. अभय फिरोदिया, अध्यक्ष, फोर्स मोटर्स लिमिटेड यांच्या हस्ते होणार असून, डॉ. आनंद देशपांडे, संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पर्सिस्टंट सिस्टीम्स हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनात तात्काळ डील्स, नामांकित वित्तसंस्थांकडून गृहकर्ज सहाय्य, लकी ड्रॉ आणि आकर्षक भेटवस्तू अशी विशेष आकर्षणे असणार आहेत. मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला दि. 15 जानेवारी 2026 रोजी चॅनल पार्टनर्स व विकासकांसाठी देशातील सर्वात मोठा नेटवर्किंग कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यात सुमारे 1,000 चॅनल पार्टनर्स सहभागी होणार आहेत.
क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले, पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2026 हे रिअल इस्टेट क्षेत्रातील विश्वासार्हता, पारदर्शकता आणि जबाबदार वाढ यांप्रती क्रेडाई पुणेची बांधिलकी दर्शवते. पुणे हे मालमत्ता गुंतवणुकीसाठी अग्रगण्य शहरांपैकी एक असून, या एक्स्पोमध्ये 400 पेक्षा अधिक रेरा-प्रमाणित प्रकल्प पाहायला मिळणार आहेत.





