‘लोकसभेच्या आम्ही जिंकलेल्या 19 जागा आमच्याकडेच राहणार’ – संजय राऊत

मुंबई – महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला अद्याप निश्चीत झालेला नाही पण गेल्या निवडणुकीत शिवसेनेने ज्या 19 जागा जिंकल्या होत्या त्या जागा आमच्याकडेच राहतील असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने (अविभाजित) महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 18 आणि दमण आणि दीवमध्ये एक जागा जिंकली. राज्यातील गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने 18 जागा जिंकल्या असल्या तरी त्यातील 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत.
तथापि हे पक्षांतर झाले असले तरी त्या जागा शिवसेनेनेच जिंकलेल्या असल्याने त्या आमच्याकडेच राहतील असे ते म्हणाले. गेल्या लोकसभेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चार जागा जिंकल्या आहेत. त्या जागा त्यांच्याकडेच राहतील असेही त्यांनी नमूद केले. जागा वाटपावरून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
परंतु आमच्यात अजून तो फॉर्म्युला निश्चीत व्हायचा आहे असे ते म्हणाले. ही लोकसभा आणि विधानसभेतही एकत्रित लढत देऊ असे ते म्हणाले. आमची ही एकत्रित वज्रमुठच भाजपला घरी पाठवेल असे ते म्हणाले. लोकसभेच्या पुढील निवडणुका पुढील वर्षी एप्रिल मे महिन्यात होणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणूका होतील.





