…म्हणून दिलं औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण; फडणवीसांनी सांगितलं त्यामागचं कारण

भिवंडी : शिवजयंतीच्या मुहूर्तावर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली. इथे महिमा मंडन होईल तर शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही. औरंगजेबाच्या कबरीला ASI ने पन्नास वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर उद्घाटनाच्या वेळी सांगितलं.
पुढे म्हणाले, महाराजांचं मंदिर याकरता, कारण आज आपण आपल्या मंदिरात जाऊन ईष्ट देवतेची साधना करु शकतो. याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देश, देव, धर्माची लढाई जिंकली, म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. आपल्या देवतेचं दर्शन करु शकतो. केवळ हे मंदिर नाहीय. ही सुदंर तटबंदी आहे. अतिशय चांगला बुरुज त्या ठिकाणी आहे. दर्शनी प्रवेशाचा मार्ग आहे. बंगीच्याची जागा आहे. शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग त्या ठिकाणी पहायला मिळतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम हे युगपुरुष का आहेत?. प्रभू श्रीराम ईश्वर होते, मग रावणाशी लढण्यासाठी त्यांना सैन्याची आवश्यकता का होती?. त्यांनी चमत्काराने रावणाला हरवायला पाहिजे होतं. पण ते युगपुरष होते. त्यांना माहित होतं की, जो पर्यंत असुरी शक्तींना संपवण्यासाठी मी समाजाला जागृत करणार नाही, समाजातील कमजोर व्यक्तीच्या मनात शक्ती निर्माण करणार नाही.
रावणाची शक्ती कितीही मोठी असली, तरी ती अर्धमाची शक्ती आहे. अर्धमाच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निर्माण झाला पाहिजे. म्हणून प्रभू श्रीरामांनी समाजातील छोट्यात-छोट्या व्यक्तीला एकत्र केलं. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याच बळावर जगातील मोठ्या अधर्मी शक्तीचा निपात केला. म्हणून एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम युगपुरुष आहेत, असं फडणवीस म्हणाले.
भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर
छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर भिवंडी येथील मराडे पाडा या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तब्बल चार एकर जागेत उभारण्यात आलेल्या मंदिराचा लोकार्पण सोहळा 17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती अयोध्यातील श्री रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे. गाभारा सभामंडप 2500 चौरस फूट क्षेत्राचा आहे. मंदिराभोवती 4 बुरूज आहेत. 56 फूट उंचीचं भव्य मंदिर असून मंदिराला 36 फूट उंचीचं महाद्वार आहे. चार एकर परिसरातील एक एकर क्षेत्रावर 56 फूट उंचीचे हे मंदिर गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. मंदिराचा सभामंडप परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा आहे.





