‘बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातला ‘तो’ धनुष्यबाण आमच्याकडेच…’- उद्धव ठाकरे

मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असणारी शिंदे गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचावर जोरदार हल्ला बोल चढवला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, निवडणूक आयोग, भाजपासह मोदी सरकारचा सुद्धा समाचार घेतला.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अशीही भीत व्यक्त केली की, ‘उद्या आमचं मशाल चिन्हही ते घेतील. पण मशाल आता पेटलीय. जेवढा अन्याय कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवशी त्यांनी चोरलेलं धनुष्यबाण कागदावरचं आहे आणि खरं धनुष्यबाण माझ्याकडे आहे.
अनेकांना वाटलं असेल की शिवसेना संपली पण शिवसेना लेचीपेची नाही. पहिल्या दिवसापासून आमच्याकडे शिवसेना नव्हती. आमच्याकडे धनुष्यबाण आहे शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यात आहे. त्याची पूजा आजही आम्ही करतो आणि तो पुजेतच राहणार असल्याचं ठामपणे उद्ध ठाकरे यांनी सांगितलं.





