Thailand Open 2026 : सिंगापूर जेतेपदानंतर सात्विक-चिरागचे मिशन ‘थायलंड ओपन’; सिंधू-सेनवरही असणार देशाच्या नजरा!
Thailand Open 2026 : सिंगापूर ओपनमधील विजयामुळे उत्साहित झालेले सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची जोडी आता त्याच आठवड्यात सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याचे लक्ष्य ठेवेल.

Thailand Open Super 1000 Satwik Chirag PV Sindhu Lakshya Sen : सिंगापूर ओपनमधील विजेतेपदाचा प्रदीर्घ दुष्काळ संपवून इतिहास रचल्यानंतर, भारताची स्टार पुरुष डबल्स जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आता सलग दुसरे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘थायलंड ओपन सुपर १०००’ या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून (२ जून) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारतीय जोडीला चौथे मानांकन (सीड) मिळाले असून, पहिल्याच सामन्यात त्यांच्यासमोर मलेशियाच्या कांग खाई शिंग आणि आरोन ताई या जोडीचे आव्हान असणार आहे.
सिंगापूरमध्ये रचला इतिहास; आता थायलंडची आकडेवारी काय?
नुकत्याच झालेल्या सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात सात्विक-चिराग जोडीने पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर अद्भूत पुनरागमन केले होते. त्यांनी इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद शोहिबुल फिकरी या जोडीला पराभूत करून पहिल्यांदाच सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले. सिंगापूर ओपनमध्ये डबल्स प्रकारात विजेतेपद मिळवणारी ही भारताची इतिहासातील पहिलीच जोडी ठरली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी २०२४ मध्ये त्यांनी थायलंड ओपनचे विजेतेपद जिंकले होते, परंतु त्यानंतर सलग चार स्पर्धांमध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
Singapore Photo Dump 🇸🇬📸
The first-ever Indian doubles pair to win the Singapore Open!🇮🇳
A quick recap of the celebration, the medal ceremony, and a whole lot of history.The Mentality Monsters strike again. ⚡️🦁
📸 @badmintonphoto pic.twitter.com/KyQHWam1Eu
— BAI Media (@BAI_Media) May 31, 2026
या स्पर्धेत भारताची दुसरी जोडी एम. आर. अर्जुन आणि हरिहरन अम्साकरूणान यांचा सामना मलेशियाच्या नूर मोहद अजरीन आयुब आणि तान वी कियोंग यांच्याशी होईल. जर या दोन्ही भारतीय जोड्यांनी आपापले पहिले सामने जिंकले, तर दुसऱ्याच फेरीत भारतीय फॅन्सना ‘भारत विरुद्ध भारत’ अशी हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळू शकते.
पी. व्ही. सिंधू, लक्ष्य आणि श्रीकांतवरही असणार मोठी मदार –
महिला सिंगल्समध्ये भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात थायलंडच्याच बुसानन ओंगबामरुंगफान विरुद्ध करणार आहे. सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती. इतर भारतीय महिला खेळाडूंमध्ये मालविका बंसोडला थायलंडच्या सातव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगचा सामना करावा लागेल, तर युवा शटलर उन्नती हुड्डाला पहिल्याच फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेल्या नोझोमी ओकुहारासारख्या तगड्या खेळाडूचे आव्हान मिळाले आहे.





