मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटीला गेले आहेत. त्यांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि आमदार मिलिंद नार्वेकर तसेच माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसोबत या भेटीत बैठक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, स्मारकाच्या कामासंदर्भाने तीन महत्त्वाचे नेते भेटल्याने राजकीय तर्कवितर्कही लावले जात आहेत. तसेच, या भेटीतून काही राजकीय अर्थही काढले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले असून मुंबई आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजप कसोशीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमधील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने घेतलेल्या तीन निर्णयांना फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समितीवरूनही एकनाथ शिंदे यांना हटविण्यात आले आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे तीन प्रमुख नेते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. मुंबईतील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय बांधण्यात येणार आहे. त्यानुसार येथे ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय उभारण्यात येत आहे. त्यामुळे याच स्मारकाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचे मोठे नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे यांचे जे स्मारक उभे राहत आहे त्याचे अध्यक्षपद ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ते कायम ठेवावे यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर आली आहे.