BMC News : अखेर वाद मिटला.! बीएमसीत ठाकरेसेना आणि मनसेचा समेट; २५ मिनिटांच्या चर्चेनंतर वादावर पडदा
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही चर्चेवर समाधान व्यक्त करत कोणतीही वेगळी भूमिका घेणार नसल्याचे संकेत दिले.

Raj Thackeray – Uddhav Thackeray : मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसांपासून ठाकरेसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे.
मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ठाकरे गटाने नरमाईची भूमिका घेत मनसेला जादा प्रभाग समित्या देण्याचे मान्य केले आहे. या निर्णयामुळे महापालिकेत तटस्थ राहण्याचा पवित्रा घेतलेल्या मनसेने आता माघार घेतली असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे कामकाज करणार आहेत.
महापालिका निवडणूक एकत्र लढलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये स्वीकृत नगरसेवक पदावरून मतभेद निर्माण झाले होते. ठाकरे गटाच्या वाट्याला येणाऱ्या स्वीकृत नगरसेवक पदांपैकी एक जागा मनसेला मिळावी, अशी मागणी राज ठाकरे यांच्या पक्षाने केली होती.
मात्र, ठाकरे गटाकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मनसेने प्रभाग समिती निवडणुकीत तटस्थ राहण्याची धमकी दिली होती. बिघडलेली परिस्थिती सावरण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या उभय नेत्यांमधील २५ मिनिटांच्या चर्चेनंतर वादावर पडदा पडण्यास सुरुवात झाली.
राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर वरुण सरदेसाई (ठाकरे गट) आणि संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार (मनसे) यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या वाटाघाटीत मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले नाही, परंतु त्याऐवजी महत्त्वाच्या प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला.
यामध्ये जी नॉर्थचे २ वर्षांसाठी अध्यक्षपद, एफ साऊथचे १ वर्षासाठी अध्यक्षपद, पी पूर्व-पश्चिमचे १ वर्षासाठी अध्यक्षपद व एस आणि टीचे १ वर्षासाठी अध्यक्षपद देण्यात आले आहे.
वेगळी भूमिका घेणार नाही…
वरुण सरदेसाई यांनी चर्चेनंतर सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही मनपा निवडणूक एकत्र लढलो होतो, त्यामुळे पुढचे कामकाजही एकजुटीने व्हावे हीच आमची इच्छा होती. काही प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाटून घेतली जातील, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही चर्चेवर समाधान व्यक्त करत कोणतीही वेगळी भूमिका घेणार नसल्याचे संकेत दिले. या नव्या समीकरणामुळे महापालिकेत आता विरोधी पक्षांची युती अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसत आहे.






