केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात ठाकरे गटाच्या खासदाराचाही समावेश; केंद्रीय मंत्र्यांची उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा

Uddhav Thackeray | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्धवस्त केले. यानंतर आता सैन्य दलाच्या कारवाईसंदर्भात जगभरातील विविध देशांत जाऊन सत्यता व माहिती देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यासाठी, सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देण्यासाठी आणि पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाणार आहे. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचाही समावेश करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि शिवसेना यूबीटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी फोनवर चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी शिष्टमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने एक निवेदन जारी करत खासदार प्रियंका चतुर्वेदी पक्षाच्या वतीने या शिष्टमंडळात सहभागी होतील, असे सांगितले आहे.
The India delegations visiting various countries and SS UBT participation:
Union Minister Shri Kiren Rijiju ji had a telephonic call with Party President Shri Uddhav Thackeray ji, yesterday, with regards to this delegation.
This delegation is about India against terrorism, not…
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 20, 2025
शिवसेनेने म्हटले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे पायाभूत सुविधा आणि तळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाईमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुमत असू नये. हे शिष्टमंडळ राजकारणाबद्दल नाही, तर दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल आहे. याबद्दल खात्री असल्याने आम्ही सरकारला आश्वासन दिले की, या शिष्टमंडळाद्वारे आम्ही देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते करू.
दहशतवादाविरुद्ध काम करणाऱ्या सशस्त्र दलांसोबत आपण सर्वजण एक आहोत यात शंका नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, शिवसेनेने असेही म्हटले की, पहलगाममधील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा प्रणालीबद्दल आमचे स्वतःचे मत आहे आणि आम्ही आमच्या देशाच्या हितासाठी आमच्या देशात प्रश्न विचारत राहू. पण, पाकिस्तान आधारित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे, जेणेकरुन तो नष्ट करता येईल, असेही शिवसेनेने म्हटले.
संजय राऊतांंनी व्यक्त केली होती नाराजी
दरम्यान, सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळात शिवसेना शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग झाला. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून एकाही खासदाराचा सहभाग या शिष्टमंडळात करण्यात आला नव्हता. त्यावरुन, खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. संसदेतील आपल्या खासदारांचं संख्याबळ सांगत त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षात भेदभाव केल्याचेही म्हटले होते. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन सर्वपक्षीय शिष्टमंडळ संदर्भात माहिती दिली.
हेही वाचा:





