Chhagan Bhujbal : नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत नवा ट्विस्ट; भुजबळांच्या एंट्रीने मातब्बर नेत्यांची डोकेदुखी वाढणार

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील गच्छंतीनंतर रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली. भुजबळ मंत्री झाल्याने मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या मातब्बर नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
अनेक वर्षांचा पालकमंत्री पदाचा अनुभव असल्याने भुजबळदेखील नाशिकसाठी आग्रही असण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेसेनाही आग्रही आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने पालकमंत्रिपद आपल्याकडेच असावे. असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे वजनदार नेते असलेले दादा मुसे याच जिल्ह्यातून येत असल्याने पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी तेही प्रयत्नशील आहे.
यातच नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर असून प्रजासत्ताकदिनी त्यांच्या हस्तेच झेंडावंदनही पार पडले होते.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, शिंदेसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन या तीन नेत्यांमध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता या स्पर्धेतील चुरस वाढली आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा महायुतीकडून नेमका कसा सोडवला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली. भुजबळांनी मुंबईमध्ये शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला. भुजबळ फार्म बाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडत आनंद साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात समर्थकांनी ठेका धरल्याचेही पाहायला मिळाले.





