ठाकरेबंधू आज दिसणार एकत्र; महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण जुळणार?

Raj Thackeray- Uddhav Thackeray | संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा विजयी मेळावा आज होणार आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. ती घडामोड ठाकरेबंधूंचे बहुचर्चित मनोमिलन घडवणारी ठरणार का, याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
मागील काही दिवस राज्यातील वातावरण त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीवरून ढवळून निघाले. हिंदी सक्तीला तीव्र विरोध दर्शवत उद्धवसेना आणि मनसेने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी मराठीजनांना साद घालत एकत्रितपणे मुंबईत ५ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र, त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीला होणारा वाढता विरोध ध्यानात घेऊन राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतले. सरकारने त्यासंदर्भात याआधी काढलेले जीआर (सरकारी आदेश) रद्दबातल केले.
साहजिकच, सरकारने तूर्तास घेतलेली माघार उद्धवसेना आणि मनसेचा उत्साह वाढवणारी ठरली. सरकारने जीआर रद्द केल्यानंतर उद्धवसेना आणि मनसेने प्रस्तावित मोर्चाही रद्द केला. मात्र, मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले. आता तो मेळावा आज मुंबईतील वरळी डोम येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामध्ये ठाकरेबंधू काय बोलणार, इतर कुठले पक्ष मेळाव्यात सहभागी होणार याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार का?
मेळाव्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी उद्धवसेना आणि मनसेने संयुक्त टिझर जारी केला. मराठीची एकजूट दाखवून, महाराष्ट्राची वज्रमूठ घट्ट आवळून मराठी माणसाची ठाकरी गर्जना ऐकायला डरकाळी फोडत या, असे आवाहन टिझरद्वारे करण्यात आले आहे.
दरम्यान, मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय दिलजमाई करणार का? आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची राजकीय युतीही होणार का याची उत्सुकता आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधित मेळावा राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेने नेणारा ठरणार का ते आगामी काळात स्पष्ट होईल. Raj Thackeray- Uddhav Thackeray |
हेही वाचा:
Pune : थोरले बाजीराव पेशव्यांचे चरित्र प्रेरणादायी – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा;




