महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळापासून चर्चेत असलेली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची युती (Thackeray Brothers Alliance) अखेर अधिकृत झाली आहे. तब्बल १८-२० वर्षांच्या राजकीय वैरानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू एकत्र आले आहेत. २४ डिसेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि इतर महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल करत महायुतीला टोला लगावला. ते म्हणाले, “महाराष्ट्रात मुल पळवणाऱ्या टोळ्या होत्या, आता राजकीय पक्ष चोरणाऱ्या दोन नव्या टोळ्या वाढल्या आहेत.” तर उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला भावनिक आवाहन करत म्हटले, “मराठी अस्मितेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच होईल. मराठी माणसा, आमच्या पाठीशी उभं राहा.” दोन्ही नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर एकाच गाडीतून पत्रकार परिषदेला पोहोचले होते. मुंबईतील २२७ जागांसाठी जागावाटपाचा तपशील जाहीर झालेला नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना (उबाठा)ला १४५-१५० जागा, तर मनसेला ६५-७० जागा मिळण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेत जागावाटप अंतिम झाले असून इतर ठिकाणी चर्चा सुरू आहे. युतीनंतर मनसेला धक्का युतीची घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच मनसेला मोठा धक्का बसला. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मनसे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेला निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून अनेक नेते महायुतीत गेले होते. आता मनसेतूनही गळती सुरू झाली आहे. मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी पक्षातील नाराजी आणि गळती थांबवणे हे दोन्ही पक्षांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यात मराठी अस्मितेच्या राजकारणाला नवे बळ मिळाले असून महायुतीसमोरील आव्हान वाढले आहे. आता जागावाटप आणि उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.