Nawab Malik | मुंबईतील निवडणुकीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. नबाव मलिकांमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच त्यांच्यावरच अजित पवारांनी जबाबदारी टाकल्याने या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याने मुंबईत आघाडी करण्यास भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक म्हणाल्या की, “मुंबई विभागाने आगामी निवडणुकीसंदर्भात २२७ प्रभागांचे सर्वेक्षण केले आहे. त्या अहवालावर आज आम्ही चर्चा केली. तो अहवाल आम्ही उद्या पक्षाध्यक्ष अजित पवार यांना देणार आहोत. स्वबळावर लढायचे की महायुतीमध्ये लढायचे याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल. नवाब मलिक हे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बनवलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर फक्त आरोप असून ते सिद्ध झालेले नाहीत.” दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ५० जागा लढवण्याची तयारी केली आहे. २०१७ च्या निवडणुकीत अखंड राष्ट्रवादीने मुंबई महापालिका निवडणुकीत ९ जागा जिंकल्या होत्या. मुंबईत पक्षाच्या सना मलिक या एकमेव आमदार आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची संयुक्त बैठक नवाब मलिकांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादीला डावलत मुंबईत शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पहिली संयुक्त बैठक पार पडली. यावेळी मुंबईत 150 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. तसंच येत्या एक ते दोन दिवसात अंतिम जागावाटप पूर्ण करणार असल्याचं आशिष शेलारांनी स्पष्ट केलं. Nawab Malik | नवाब मलिक यांच्यावरील आरोप कोणते? नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम कासकरच्या डी-कंपनीसोबत कट रचून अनेक भूखंड असलेल्या कुर्ल्यातील मालमत्ता लाटल्याचे आरोप भाजपने केले होते. यानंतर ईडीने मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये वैद्यकीय कारणास्तव ते जामिनावर बाहेर आहेत. Nawab Malik | दाऊदची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान व नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे. मुंबई बाँबस्फोटातील आराेपींशी मलिक यांनी जमीन खरेदी व्यवहार केल्याचे हेच कारण देत आता भाजपने राष्ट्रवादीला मुंबईत विरोध केला आहे. याआधी देखील मलिक यांना भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. हेही वाचा: पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांकडे एकत्रित लढण्याचा दिला प्रस्ताव