TET Paper Leak: शालेय शिक्षणमंत्र्यानी राजीनामा द्यावा! टीईटी पेपर फुटीप्रकरणी एसएफआय आणि मनविसे रस्त्यावर
TET Paper Leak: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अक्षम्य ढिसाळ कारभारामुळे टीईटीचा पेपर फुटल्याचा आरोप; विविध विद्यार्थी संघटनांचा पुण्यात एल्गार.

TET Paper Leak – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि शालेय शिक्षण मंत्रालयाच्या अक्षम्य ढिसाळ कारभारामुळे टीईटी परीक्षेचा पेपर फुटला. याची जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा, पेपरफुटीची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयासमोर सोमवारी (दि. २९) तीव्र आंदोलन केले. परीक्षा परिषदेच्या आवारात आंदोलन केल्याने तेथे तणावपूर्ण वातावरण होते. आवारात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता.
सूत्रधारांना अटक करा – स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया
अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी, पुनर्परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात, परीक्षांचे काम खासगी कंपन्यांना देणे कायमचे बंद करावे, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्याच्या मागण्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आल्या. राज्य सचिव सोमनाथ निर्मळ, जिल्हाध्यक्ष संस्कृती गोडे, शहराध्यक्ष आकाश लोणकर, शहर सचिव गणेश जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
अध्यक्षांची खुर्ची थेट दालनाबाहेर आणली – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्या खुर्चीला हार घालून ती सहाव्या मजल्यावरून खाली आणली. त्या खुर्चीवर माठ ठेवत शासन-प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला व परीक्षा परिषदेच्या फलकालाही काळे फासले. पेपरफुटीमागे दलाल व मंत्रालयापासून परीक्षा परिषदेपर्यंतची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे.
केवळ प्याद्यांना अटक करून सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी आणि शिक्षणमंत्री भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; अन्यथा परीक्षा परिषदेचे कामकाज बंद पाडू, असा इशाराही या वेळी देण्यात आला. मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात अभिषेक थिटे, सारंग सराफ, परीक्षित शिरोळे, केतन डोंगरे, अशोक पवार,ऋषी जाधव आदी सहभागी झाले होते.





