HSC Board Exam 2026 : १५ लाख विद्यार्थी अन् ५०० मीटरची लक्ष्मणरेषा; यंदा बारावीच्या परीक्षेत काय बदलले? वाचा सविस्तर
HSC Board Exam 2026 : राज्यात १५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा कस; झेरॉक्स सेंटर्स बंद राहणार तर गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार थेट पोलीस कारवाई.

HSC Board Exam 2026 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे आजपासून (१० फेब्रुवारी) राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या विद्यार्थीसंख्या सुमारे २७ हजारांनी वाढली आहे.राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येत आहे.
गतवर्षी १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा नोदणी केलेल्या १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख २० हजार २२९ मुले, ७ लाख १२ हजार २४० मुली, तर १८ तृतीयपंथी विद्यार्थी आहेत. माहिती तंत्रज्ञान सामान्यज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी २ लाख ३६ हजार ३२०, सामान्य ज्ञान या विषयासाठी १ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.विद्यार्थ्यांनी राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेलेच वेळापत्रक ग्राह्य धरावे.
गेल्या वर्षीप्रमाणेच परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या ९ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने (झेरॉक्स केंद्र) बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे, कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास संबंधितांवर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची जिल्हा दक्षता समितीची जबाबदारी आहे, असेही बेडसे म्हणाले.
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या
-पुणे – २ लाख ६० हजार १४
-नागपूर – १ लाख ६० हजार ५३०
-छत्रपती संभाजीनगर – १ लाख ९१ हजार ४९३
-मुंबई – ३ लाख ५२ हजार ७१८
-कोल्हापूर – १ लाख १६ हजार ६११
-अमरावती – १ लाख ५६ हजार ९१५
-नाशिक- १ लाख ७३ हजार ६५१
-लातूर- ९६ हजार ५४२
-कोकण- २४ हजार १३
शाखानिहाय विद्यार्थी
-कला – ३ लाख ८० हजार ६९२
-वाणिज्य – ३ लाख २० हजार १५२
-विज्ञान – ७ लाख ९९ हजार ७७३
-व्यावसायिक अभ्यासक्रम – २७ हजार ३७८
-आयटीआय – ४ हजार ४९२





