महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उघडणार ‘टेस्ला’चे पहिले शोरूम, महिन्याला भरणार 35 लाख भाडं

Tesla Car Company | अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. गेल्याकाही वर्षांपासून कंपनी भारतीय बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आता मस्क आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर कंपनीची लवकरच भारतात एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
या इलेक्ट्रिक कंपनीने भारतातील त्यांच्या शोरूमसाठी जागा निश्चित केली आहे. कंपनीने भारतात आपल्या पहिल्या शोरूमसाठी जवळपास 4,000 वर्गफूट जागा भाड्याने घेतली आहे. या जागेसाठी कंपनी दरमहिन्याला लाखो रुपये भाडे देणार आहे.
रिपोर्टनुसार, टेस्लाचे भारतातील पहिले शोरूम महाराष्ट्रातील मुंबईत उघडणार आहे. कंपनीने मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये भारतातील पहिल्या शोरूमसाठी जागा भाड्याने घेतली आहे. कंपनीने BKC मेकर मॅक्सिटी येथे ग्राउंड फ्लोअरवर 4,000 चौरस फुट जागा भाड्याने घेतली असून, या जागेसाठी दरमहिन्याला तब्बल 35 लाख रुपये भाडे भरणार आहे.
टेस्लाने ही जागा 5 वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. या शोरूमच्या माध्यमातून कंपनी कारच्या वेगवेगळ्या मॉडेलची विक्री करणार आहे. कंपनीकडून एप्रिलपासून कारची विक्री सुरू केली जाऊ शकते. मुंबईसोबतच दिल्लीमध्येही शोरूम उघडण्याची कंपनीची योजना आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, मस्क आणि मोदींच्या भेटीनंतर टेस्लाच्या भारतातील प्रवेशाची शक्यता वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने मुंबई, पुणे आणि दिल्लीमध्ये नोकरभरती देखील सुरू केली होती. टेस्लाची भारतात एन्ट्री झाल्याने इलेक्ट्रिक कार बाजाराला फायदा होण्याची शक्यता आहे.





