इलॉन मस्क सोडणार ट्रम्प यांची साथ? DOGE होणार बंद? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले…

Donald Trump Hints DOGE Shutdown | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा कार्यभार स्विकारल्यापासून अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. यापैकी एक निर्णय म्हणजे ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी’ची (DOGE) स्थापना करणे. या विभागाची जबाबदारी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडे आहे. या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट सरकारी खर्चात कपात करणे हे आहे. मात्र, आता लवकरच हा विभाग बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत.
मस्क यांच्या नेतृत्वाखालील DOGE विभागाने एकापाठोपाठ अनेक मोठे निर्णय घेतले, ज्यात सरकारमधील अनेक विभाग बंद करणे आणि हजारो कर्मचाऱ्यांची नोकरीतून हकालपट्टी करणे यांसारख्या कठोर पावलांचाही समावेश आहे.आता मात्र हा विभाग लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
मस्क यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, DOGE विभाग यावर्षी मे महिन्यापर्यंत आपले महत्त्वाचे लक्ष्य पूर्ण करेल. त्यांनी लवकरच आपले काम पूर्ण करून या पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत DOGE बद्दल बोलताना ट्रम्प यांनी मस्क यांच्याशिवाय हा विभाग बंदही होऊ शकतो, असे म्हटले आहे. मस्क यांच्याशिवाय हा विभाग आपले कार्य पुढे चालू ठेवेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “मी याबद्दल निश्चितपणे सांगू शकत नाही. यामध्ये अनेक अधिकारी कार्यरत आहेत. अनेक एजन्सीचे प्रमुखही आहेत आणि त्यांनी या काळात खूप काही शिकले आहे.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “मला वाटते की त्यापैकी काहीजण DOGE मधील लोकांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात, पण मला असे वाटते की एक ना एक दिवस हा विभाग निश्चितपणे बंद होईल.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे हा विभाग लवकरच बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जातआहे.
दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना मस्क म्हणाले होते की, ‘त्यांना आशा आहे की ते निर्धारित वेळेत संघीय खर्चात 1 ट्रिलियन डॉलरची कपात करतील. जर त्यांनी याच वेगाने काम सुरू ठेवले, तर लवकरच अमेरिकेचे वार्षिक नुकसान निम्म्यावर येईल.’ तसेच, ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी’ आणि मस्क यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे त्यांच्यावर टीका देखील होत आहे.





