न्यूयॉर्क : अब्जाधीश इलॉन मस्क यांचे नाव अत्यंत वादग्रस्त जेफ्री एपस्टाईन फाइल्समध्ये समोर आले आहे. यापूर्वी प्रिन्स अँड्र्यू, डोनाल्ड ट्रम्प यांचे सहयोगी स्टीव्ह बॅनन आणि पीटर थील यासारख्या इतर प्रमुख व्यक्तींचे नाव घेण्यात आले आहे. या घटनेमुळे जागतिक राजकारण आणि व्यावसायिक वर्तुळात एक नवीन खळबळ उडाली आहे. शुक्रवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींनी अमेरिकी काँग्रेसच्या हाऊस ओव्हरसाइट कमिटीला सादर केलेली न्याय विभागाची कागदपत्रे प्रसिद्ध केली. २०१९ मध्ये कोठडीत आत्महत्या करणाऱ्या जेफ्री एपस्टाईन याच्याविरुद्ध लैंगिक तस्करीचे खटले कसे हाताळले गेले याच्या चौकशीचा भाग या फायली आहेत. तथापि, जेफ्री एपस्टाईन फाइल्समध्ये त्यांचे नाव समोर आल्यानंतर मस्क यांनी हे आरोप फेटाळले आहेत. सहा पानांच्या कागदपत्रांमध्ये एपस्टाईनच्या कॅलेंडर आणि आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती आहे. तसेच मस्क आणि एनस्टाईनच्या कथित भेटीचा उल्लेख आहे. उल्लेखनीय म्हणजे, ही भेट एपस्टाईनला लैंगिक गुन्हेगार घोषित केल्यानंतर सहा वर्षांनी झाली. इतर कागदपत्रांमध्ये ब्रिटनच्या प्रिन्स अँड्र्यूचे नाव देखील उघड झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, मस्क यांनी स्वतः सोशल मीडियावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला होता आणि म्हटले होते की ट्रम्प एपस्टाईन फाइल्समध्ये देखील सामील आहेत. त्यानंतर, जुलैमध्ये, मस्क यांनी उघडपणे सांगितले होते की जर ट्रम्प यांना खरोखर पारदर्शकता हवी असेल तर त्यांनी एपस्टाईन फाइल्स सार्वजनिक कराव्यात; अन्यथा, जनता त्यांच्यावर कसा विश्वास ठेवेल? ट्रम्प यांच्याशी असलेले त्यांचे दीर्घकालीन संबंध आणि प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी यापूर्वी ट्रम्प यांच्या कर आणि खर्च धोरणांवर टीका केली होती. या खुलाशांमुळे केवळ अमेरिकन राजकारणातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडाली आहे. मस्क, बॅनन, थिएल आणि प्रिन्स अँड्र्यू सारख्या हाय-प्रोफाइल लोकांची नावे पुढे येताच हे प्रकरण कसे वळण घेते याची चर्चा आता सुरू आहे.