पेशावर – पाकिस्तानी सुरक्षा दलांनी शनिवारी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका पोलिस ठाण्यावरील दहशतवाद्यांचा हल्ला उधळून लावल्याचा दावा केला. शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे १२ सशस्त्र दहशतवाद्यांनी लक्की मारवत जिल्ह्यातील गाम्बिला पोलिस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, ड्युटीवर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांना पाहिले आणि पोलिस कारवाईनंतर त्यांना माघार घ्यावी लागली. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पोलिस स्टेशनमधील सर्व कर्मचारी सुरक्षित राहिले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यानंतर, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान खैबर पख्तूनख्वा प्रांतातच हातबॉम्ब फेकण्याच्या प्रयत्नात हातबॉम्बचा हातातच स्फोट झाल्याने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा एका दहशतवादी कमांडर ठार झाला. असे सूत्रांनी सांगितले. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर जिल्ह्यातील तिरह व्हॅलीमध्ये क्वाडकॉप्टर चालवण्याचा प्रयत्न करत असताना चुकून बॉम्ब पडल्याने यासीन उर्फ अब्दुल्लाह हा दहशतवादी कमांडर ठार झाला. या घटनेत त्याचे दोन सहकारीही जखमी झाले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासीन आणि त्याचा गट २४ मे रोजी औपचारिकपणे बंदी घातलेल्या टीटीपीमध्ये सामील झाला होता. तो टीटीपी, लष्कर-ए-इस्लाम आणि अन्सार-उल-इस्लाम सारख्या अतिरेकी गटांचे केंद्र असलेल्या तिरह प्रदेशात गटाच्या दहशतवादी कारवायांचे नेतृत्व करत होता.