Nigeria Terrorist Attack – नायजेरियाच्या इशान्य भागातील एका लष्करी तळावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या सशस्त्र हल्ल्याच्या प्रयत्नादरम्यान अनेक सैनिक ठार झाले आहेत. हा हल्ला बोर्नो प्रांताच्या बेनिशेख भागातल्या लष्करी तळावर झाला, असे लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले. हा एक दहशतवादी हल्ला होता, असे या प्रवक्त्याने सांगितले. या हल्ल्यात किती सैनिक मारले गेले, हे या प्रवक्त्याने स्पष्ट केले नाही. मात्र ब्रिगेडीअर जनरल ओसेनी ब्राइमाह यांनी यावेळी लष्करी नेतृत्व केले असे त्यांनी सांगितले. अलिकडच्या काळात लष्कराने इस्लामिक स्टेटविरोधात केलेल्या कारवाईमुळे निराश झालेल्या दहशतवाद्यांनी आगतिकतेतून हा हल्ला केला. पण लष्कराने चोख प्रत्युत्तर देऊन हा हल्ला निष्फळ केल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये च्या उत्तरेकडील भागात दशकभरापासून घुसखोऱी आणि दहशतवादाची समस्या आहे. खंडणीसाठी अनेक सशस्त्र गट अपहरण करत असतात. या गटांमध्ये इस्लामिक स्टेट आणि इस्लामिक स्टेट वेस्ट आप्रकिका प्रोव्हिन्सशी संबंधित बोको हराम ही सर्वात आघाडीची संघटना आहे. याशिवाय इस्लामिक स्टेटशी संबंधित लॅकुरावा गट वायव्येकडील निगेर प्रजासत्ताकच्या सीमाभागात सक्रिय आहे.