Shirur : शिरुरमध्ये दरोडेखोरांची दहशत; ८० वर्षीय वृद्धेला रॉडने मारहाण, सशस्त्र दरोड्याने खळबळ
Shirur : या दरोड्यामुळे मलठण, टाकळी हाजी आणि कवठे येमाई परिसरात तीव्र संताप आणि प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे.

शिरूर : मलठण ता. शिरूर येथील मलठण -शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत एकनाथ दंडवते व त्यांच्या पत्नी यमुनाबाई दंडवते यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या कानातील कर्णफुले अक्षरशः ओरबाडून नेत नाकातील नथ व गळ्यातील पोत असा सुमारे २ ते ३ तोळ्यांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे. या दरोड्यामुळे मलठण, टाकळी हाजी आणि कवठे येमाई परिसरात तीव्र संताप आणि प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ दंडवते आणि त्यांच्या ८० वर्षीय वृद्ध यमुनाबाई दंडवते हे मध्यरात्री घरात भर झोपेत असताना अचानक ७ ते ८ जणांच्या सशस्त्र टोळक्याने घरात घुसून धुडगूस घातला. दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने दोघांवरही अमानुष हल्ला चढवला. नराधमांनी यमुनाबाई यांच्या कानातील कर्णफुले अक्षरशः ओरबाडून काढली, ज्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या. याशिवाय नाकातील नथ आणि गळ्यातील सोन्याची पोत असा अंदाजे २ ते ३ तोळ्यांचा ऐवज हिसकावून दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
टाकळी हाजी औटपोस्टच्या हद्दीत वारंवार विद्युत रोहित्र, विद्युत मोटर, केबल चोरी, भुरट्या चोऱ्या, दुचाकी चोऱ्या या गंभीर घटना वारंवार घडत आहे. दरोडयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. तसेच टाकळी हाजी पोलीस चौकीचे पीएसआय गोविंद खटिंग आणि ए. एस. आय. राजेंद्र चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन परिसरातील गावागावात रात्रीची प्रभावी गस्त सुरू करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे.





