Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद !

इंफाळ – मणिपूरची राजधानी इंफाळच्या काही भागांत पुन्हा जाळपोळीच्या घटना घडल्याने रविवारी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मैतेई संघटनेच्या एका नेत्याला शनिवारी संध्याकाळी कथितरीत्या ताब्यात घेतल्याच्या बातम्या यायला लागल्या. त्यानंतर याविरोधात क्वाकेइथेल आणि उरीपोक येथे विरोध प्रदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी रस्त्याच्या मधोमध टायर आणि जुने फर्निचर जाळले आणि नेत्याच्या सुटकेची मागणी केली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच चार जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी कलम 163 लागू करत लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास आणि प्रदर्शन करण्यावर बंदी घातली आहे. तर, एका जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, आतापर्यंत कतिथरीत्या अटक झालेल्या नेत्याचे नाव किंवा त्याच्यावरील आरोपांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





