नाशिकमध्ये तणाव ! अनधिकृत दर्गा हटवण्याआधीच पसरली अफवा; मध्यरात्री पोलिसांवर दगडफेक

Nashik News | नाशिकच्या काठेगल्लीमध्ये असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याआधीच तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अनधिकृत दर्गा हटवण्याची प्रोसेस सुरु झाली. त्यावेळी धर्मगुरुंनी मध्यस्थी करुन अजून अवधी पाहिजे असल्याची विनंती केली होती.
15 एप्रिल रोजी ही मुदत संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तात महापालिकेकडून कारवाई सुरु झाली. मात्र रात्री उशिरा येथे जोरदार राडा झाला. यावेळी जमावकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सध्या काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, काठेगल्ली परिसरात असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आज केली जाणार होती. पण काल रात्रीच वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडली आणि काही नागरिकांनी काठेगल्ली गाठली. यावेळी वीजपुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली. Nashik News |
५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात
काठेगल्लीमध्ये रात्री ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ४०० पेक्षा जास्त लोकांचा जमाव त्याठिकाणी एकाचवेळी आला. जमावाने आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये काही पोलिस कर्मचारी जखमी झाले.
दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ८ पेक्षा अधिक जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. रात्री १.१५ वाजेपर्यंत या भागातील तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणण्यात पथकाला यश आले.
काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिक महानगर पालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत दर्ग्याला १ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. स्वत:हून ही अनिधिकृत दर्ग्याचे बांधकाम काढून टाका नाही तर तोडकाम करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. पण पालिकेने दिलेली मुदत संपल्याने १५ एप्रिलपासून अनधिकृत दर्गा पाडण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच दर्गा परिसरातील १०० मीटरच्या अंतरावर बॅरिकेडींग करण्यात आले आहे. Nashik News |
हेही वाचा:
“चेंडू चीनच्या कोर्टात, जिनपिंग यांना घ्यावा लागेल निर्णय” ; टॅरिफ वॉरवर ट्रम्प यांचा इशारा





