मतदान केल्यानंतर दहा टक्के सवलत; पुणे हॉटेल संघटनेकडून ऑफर

पुणे – मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पूना होटेलियर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या ७४ हॉटेल्समध्ये मतदान केलेल्या मतदारांना २० व २१ नोव्हेंबर २०२४ रोजी १० टक्के सूट देण्यात येणार आहे. निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
२० नोव्हेंबर रोजी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पूना होटेलियर्स असोसिएशनने स्वत:हून पुढाकार घेत असोसिएशनशी संलग्न हॉटेल्समध्ये या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवल्यास बिलावर १० टक्के सवलत दिली जाणार आहे. मतदारांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.





