कराड (प्रतिनिधी) – कराड परिसरात कराड- विटा मार्गालगत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 10 जणांना कराड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
मंगळवारी (दि. 28) पहाटे केलेल्या या कारवाईत संशयितांकडून पोलिसांनी 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतूसे, मिरची पुड, कोयता असा एकूण 9 लाख 11 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
14 पिस्टल व 22 जिवंत काडतूसे जप्त
संशयितांवर दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु
येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षण रमेश गर्जे आदींची उपस्थिती होती.
सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी ता. कराड), अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता. कराड), अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी-कराड), धनंजय मारुती वाटकर (रा. सैदापूर-कराड), वाहीद बाबासो मुल्ला (रा. विंग ता. कराड), रिजवान रज्जाक नदाफ (रा. मलकापूर-कराड), चेतन शाम देवकुळे (रा. बुधवार पेठ, महात्मा फुलेनगर-कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ-कराड), हर्ष अनिल चंदवाणी (रा. मलकापूर-कराड), तुषार पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची-कराड) असे याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक शेख म्हणाले, “कराड शहरात कोबिंग ऑपरेशन राबवित असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या मिळालेल्या माहितीवरून मौजे राजमाची (ता. कराड) गावचे हद्दीत कराड- विटा रोडवर जानाई-मळाई मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेताजवळ काही व्यक्ती जमून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यांनतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे 2 पंचासह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोलिसांच्या पथकास उसाच्या शेतालगत आडोशास सुमारे 8 ते 10 जण उभे असल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्या व्यक्तींना ताब्यात घेतले. तसेच त्यांची अंगझडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे 9 लाख 11 हजार 900 रुपये किमतीच्या 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतुसे, मिरची पूड, कोयता असा मुद्देमाल मिळून आला. या मुद्देमालासह पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्यांच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या सूचनेप्रमाणे अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, निलेश काटकर, मोहन पवार, प्रविण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल प्रचार, सचिन ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, वैभव सावंत, कापरे, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, येळवे, कुलदीप कोळी, अमित बाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी ही कारवाई केली.