खंडाळा (प्रतिनिधी) – पारगाव खंडाळा हे पुणे-बंगळुरू महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण. परिसरात अपघाताच्या घटना वारंवार घडतात. मात्र, रात्री अपरात्री काही झाले तर खंडाळा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसतात. तसेच कर्मचारी वर्गाचे उद्धट वर्तन रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हताश करतात. अशावेळी सर्वसामान्यांनी जायचे कुठे, अशी नागरिकांची परिस्थिती आहे.
मागील वर्षी एशियन पेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून खंडाळा रुग्णालयास जवळपास ७० ते ८० लाखांची सुसज्ज यंत्रसामग्री आयसीयू केंद्रासाठी दिली गेली आहे. मात्र, फक्त डॉक्टरांअभावी ही पूर्ण यंत्रसामग्री जशीच्या तशी पडून आहे. काल (दि. २७) पहाटे गावातील एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावर संबंधित रुग्णाचे नातलग ग्रामीण रुग्णालयात गेले असता तेथील कर्मचाऱ्यांकडून डॉक्टर अनुपस्थित आहेत तसेच डॉक्टर येईपर्यंत बाहेर उभे राहा, असे उद्धटपणे सांगत गैरवर्तन केले गेले.
याप्रकरणी ग्रामीण रुग्णालय खंडाळाचे डाँ. गुरव यांच्याशी संपर्क साधला असता तब्येत खराब असल्याने बाहेर गेलो होतो व मी एकटाच असल्याने माझ्यावर अतिरिक्त कामाचा भार आहे, अशी माहिती दिली. माझ्या कर्मचाऱ्यांकडून जे उद्धट वर्तन झाले. संपूर्ण कर्मचारी वर्गाला इथून पुढे असे झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशी समज दिल्याचे त्यांनी सांगितले.
Satara : दरोड्याच्या तयारीत असलेल्या 10 जणांना शस्त्रासह अटक
तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी अविनाश पाटील यांना याबाबत विचारणा केली असता खंडाळा येथील आयसीयू केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे या केंद्रासाठी अद्यावत टेक्निकल कर्मचारी वर्गाचीही आवश्यकता आहे. या सर्व बाबींची कमतरता असल्याने आयसीयू केंद्र अजून सुरू झाले नाही. मात्र, वरिष्ठांशी आमचा नियमितपणे पाठपुरावा सुरु असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.