पुणे | सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दहा दिवस दप्तरविना शिक्षण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तरविना शिक्षण होणार आहे. या दहा दिवसांमध्ये व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम, बागकाम, मातीकाम यांसारखी व्यावहारिक कौशल्ये, सर्वेक्षण, भेटी, सहली असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र आनंददायी करण्यासह त्यांना व्यावहारिक कौशल्ये, हस्तकौशल्ये, अनुभवाधिष्ठित शिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ही शिफारस केली आहे. त्यानुसार नियमित अध्यापन- अध्ययन प्रक्रियेचा भाग म्हणूनच हा उपक्रम राबवला जाणार आहे.
भोपाळस्थित पीएसएस केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेने काही राज्यांतील शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. त्यातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकण्यात रस असण्यासह दप्तराविना दिवसांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
विद्यार्थी सरासरी सहा तास आणि वर्षभरातील सुमारे एक हजार तासांपेक्षा जास्त वेळ शाळेत असतात. किमान दहा दिवस किंवा दहा दिवस उपक्रमासाठी द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरच्या जगाचा अनुभव देण्यासाठी, दैनंदिन आयुष्यात योगदान देणारे व्यवहार समजावून देण्यासाठी, निरीक्षणांवर आधारित शिक्षणाची क्षमता विकसित करण्यासाठी, समाजाशी जोडलेले राहण्यासाठी उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्थानिक व्यावसायिकांची माहिती होईल. श्रमप्रतिष्ठेचा प्रचार होईल. विद्यार्थ्यांना अन्य क्षेत्रातील कौशल्यांचीही गरज लक्षात येईल. त्याचा त्यांना भविष्यातील करिअरची दिशा ठरवण्यासाठी उपयोग होणार आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.




