कॅनडात मंदिर अध्यक्षाच्या मुलाच्या घरावर गोळीबार; हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याच्या घटना सुरूच

सरे – कॅनडातील सरे येथे लक्ष्मीनारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या मुलाच्या घरावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. गोळीबारात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
बुधवारी म्हणजे २७ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटली नसल्याचे सांगण्यात आले. सरेतील या लक्ष्मी नारायण मंदिरावर हल्ला करण्याच्या धमक्या अगोदर देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, बुधवारच्या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही ठिकाणी छापेमारीही करण्यात आली आहे. कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार चंद्र आर्य यांनी सरे येथे एका खलिस्तान समर्थकाचा कथित व्हिडिओ शेअर केला होता.
हिंदूंच्या लक्ष्मी नारायण मंदिरात आम्हाला गोंधळ निर्माण करायचा आहे असे त्या व्हिडिओत म्हटले होते. खलिस्तान समर्थकांनी गेल्याच आठवड्यात सरे आणि बीसी येथे एका गुरूद्वाराबाहेर एका शीख कुटुंबासोबत गैरवर्तन केले होते. आता तोच खलिस्तानवादी गट लक्ष्मी नारायण मंदिराशी संबंधित घटनेच्या मागे असेल असा कयास आहे असे आर्य यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जाण्याचे प्रकार होत आहेत. कॅनडात राहणाऱ्या हिंदूंना लक्ष्य केले जाते आहे. यावर्षी ऑगस्टमध्येही खलिस्तान जनमत संग्रहचे पोस्टर हातात धरून एका मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात भारत विरोधी फलक हातात घेऊन हिंदू मंदिरालाच लक्ष्य करण्यात आले होते याकडे आर्य यांनी लक्ष वेधले.





