Suraj Chavan : सूरज चव्हाण देणार धप्पा, टॉपचा किंग होणार पप्पा.! कॉलर उडवतं दिली गुडन्यूज
सूरज आणि त्याची पत्नी संजना चव्हाण (गोफणे) यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असून, ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र यावेळी तो कोणत्याही वादामुळे, नव्या प्रोजेक्टमुळे किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे, तर त्याच्या आयुष्यातील एका आनंददायी घडामोडीमुळे चर्चेत आला आहे.
सूरज आणि त्याची पत्नी संजना चव्हाण (गोफणे) यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असून, ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला.
या व्हिडिओमध्ये संजनाचा पारंपरिक ‘चोर ओटी’ कार्यक्रम पार पडताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत गरोदर महिलेसाठी केला जाणारा हा पारंपरिक समारंभ विशेष मानला जातो. या कार्यक्रमाला कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
संजनाला पारंपरिक पेहरावात सजवण्यात आले होते. या समारंभातील आनंदी वातावरण आणि कुटुंबीयांचा उत्साह व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेअर करताना जान्हवीने सूरज आणि संजनाला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सूरजने स्वतःच दिली आनंदाची बातमी :
View this post on Instagram
“नमस्कार जय महाराष्ट्र… तुमचा सूरज भाऊ आज लय खूश आहे. लय आनंदात आहे. टॉपचा किंग तुमचा बाबा होणार आहे. तुमचा सूरज चव्हाण देणार धप्पा… टॉपचा किंग होणार पप्पा.” या व्हिडिओला त्याने “मी बाबा होणार” असे कॅप्शन दिले असून काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
बिग बॉसनंतर बदललं आयुष्य :
सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’चे विजेतेपद पटकावल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. साध्या कुटुंबातून आलेल्या सूरजने आपल्या संघर्षमय प्रवासामुळे आणि दिलखुलास स्वभावामुळे प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉसच्या घरात त्याने केलेला खेळ, त्याची प्रामाणिक भूमिका आणि सामान्य माणसाशी जोडलेली प्रतिमा यामुळे तो घराघरात पोहोचला.
नोव्हेंबर २०२५ मध्ये बांधली लग्नगाठ :
सूरजने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याची बालमैत्रीण संजना गोफणे हिच्यासोबत विवाह केला होता. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. चाहत्यांनी या जोडप्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता.
लग्नानंतरही सूरज आणि संजना सोशल मीडियावर सक्रिय असून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता त्यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.






