‘लोकशाही बसली धाब्यावर’, खासदार निलंबनानंतर तेजस्विनी पंडितची संतप्त प्रतिक्रिया; ट्विटनं वेधलं सर्वांचंच लक्ष

Tejaswini Pandit : मागच्या दोन दिवसांपासून देशातील राजकारणात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदारांनी केलेल्या वर्तणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. हे सगळे खासदार लोकसभा आणि राज्यसभेतले आहेत. लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन द्यावं.
ही मागणी विरोधी पक्षातले खासदार करत होते. त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच कारवाईच्या मुद्द्यावरून मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) एक ट्वीट शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
तेजस्विनी पंडितनं ट्वीटमध्ये लिहिलं, “चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही….! लोकशाही बसली धाब्यावर !!! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?” तेजस्विनीनं या ट्वीटला नो डेमोक्रसी आणि अधिवेशन हे दोन हॅशटॅग्स देखील दिले असून, तिची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही….!
लोकशाही बसली धाब्यावर !!!हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास ??#NoDemocracy #Adhiveshan
— TEJASWWINI (@tejaswwini) December 19, 2023
दरम्यान ही पहिलीच वेळ नव्हे जेव्हा तेजस्विनी पंडितने ट्विटरच्या माध्यमातून राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे. तिने याआधी राज्यातील टोल प्रश्नासंदर्भात एक पोस्ट केली होती. त्यानंतर ट्विटरवरुन तिचे व्हेरिफिकेशन हटवण्यात आल्याचा आरोप करत तेजस्विनीने परखड मत व्यक्त केले होते. आता अभिनेत्रीने संसदेत विरोधकांच्या निलंबनाविषयी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.





