#TeamIndia : वेगवान गोलंदाज भुवनेश्वरच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह

मुंबई :- भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. भारतीय संघात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी त्याच्या नावाचाही विचार झाला नसल्याने त्याने आता आपल्या कारकिर्दीबाबत लवकरच निर्णय घ्यावा, असेच संकेत जणू बीसीसीआयने त्याला दिले आहेत.
भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय तसेच पाच टी-20 सामन्यांची मलिका खेळणार आहे. मात्र, यातील कोणत्याही मालिकेसाठी भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळेच आगामी आशिया करंडक स्पर्धा तसेच भारतातच होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठीही त्याचा विचार केला जाणार नसल्याचेच निवड समितीने संकेतानुसार सांगितले आहे.
निवड समितीने यंदा न्यूझीलंड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्धच्या मालिकांमध्येही त्याला स्थान दिले नव्हते. त्यामुळे कसोटी पाठोपाठ त्याची एकदिवसीय कारकीर्दही जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
भुवनेश्वरने भारतीय संघासाठी अखेरचा एकदिवसीय सामना 21 जानेवारी 2022 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तसेच अखेरचा टी-20 सामना 22 नोव्हेंबर 2022 साली न्यूझीलंडविरुद्ध खेळला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार हाच जसप्रीत बुमराहपेक्षा जास्त प्रमुख गोलंदाज मानला जात होता. चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळेच तो यशस्वी ठरत होता. मात्र, गेल्या मोसमात त्याला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत होता. तसेच त्याला सातत्याने दुखापतींचाही सामना करावा लागला व त्यामुळे त्याचे संघातील स्थानही कायम राहात नव्हते.
नवोदितांमुळे स्थान धोक्यात…
महंमद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट या वेगवान गोलंदाजांनी आता भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले. याशिवाय जसप्रीत बुमराहही लवकरच पुनरागमन करणार आहे. अशा स्थितीत भुवनेश्वरसाठी संघात आता जागाच नसल्याचे हे संकेत आहेत.





