Indian Cricket Team Full Schedule : टीम इंडिया सध्या विश्रांतीवर आहे. मात्र, पुढील महिन्यात होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये काही खेळाडू सहभागी होताना दिसतील. जर आपण आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोललो तर ते 19 सप्टेंबरपासून सुरू होतील, जेव्हा बांगलादेश संघ भारत दौऱ्यावर येईल. सध्या फारसे सामने होणार नाही, पण सप्टेंबरच्या अखेरीपासून सलग सामने होतील आणि ते पुढील वर्षापर्यंत सुरू राहतील. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ज्यावर एक नजर टाकूया…
भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबरपासून ते पुढील वर्षी मार्च या कालावधीत कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळताना दिसणार आहे. यामध्ये बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य आणि आघाडीच्या संघांशी स्पर्धा होणार आहे. सामने भारतात आणि परदेशी भूमीवर खेळवले जातील.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत बांगलादेशविरूध्द कसोटी मालिका…
सर्वात आधी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत, त्यानंतर दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. या मालिकेला कमी लेखता येणार नाही, कारण ती जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे. कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 6 ऑक्टोबरपासून ग्वाल्हेरमध्ये सुरू होणार आहे. दीर्घ कालावधीनंतर ग्वाल्हेरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. यानंतर 9 आणि 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली आणि हैदराबादमध्ये सामने होणार आहेत.
कोहली आणि रोहितशिवाय टीम खेळणार टी-20 मालिका…
बांगलादेशविरुद्धची टी-20 मालिका टी-20 विश्वचषक 2026 च्या तयारीसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक ठरेल. या मालिकेसाठी बीसीसीआयची निवड समिती नवीन आणि तरुण खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाईल. पुढचा टी-20 विश्वचषक दूर आहे हे खरे, पण तरीही त्यासाठीची तयारी आत्तापासूनच करावी लागणार आहे.
न्यूझीलंडविरूध्दही होणार कसोटी मालिका…
बांगलादेशनंतर भारत न्यूझीलंडसोबत आणखी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करणार आहे. त्याचे सामने बेंगळुरू,पुणे आणि मुंबई येथे होणार आहेत. ही मालिकाही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार असल्याने याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. न्यूझीलंड संघ अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे ही मालिका खूपच मनोरंजक आणि संघर्षाने भरलेली असेल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक विजय किंवा पराभवाचा थेट परिणाम चॅम्पियनशिप टेबलमधील भारताच्या स्थानावर होणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत खरी कसोटी…
टीम इंडियाच्या परदेश दौऱ्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत चार सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत जाऊन तिथे खेळणे भारतीय संघासाठी कधीच सोपे राहिले नाही. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघाची खरी परीक्षा होणार आहे. या मालिकेची सुरुवात 8 नोव्हेंबरपासून डर्बनमध्ये होईल, त्यानंतर गेकेबेर्हा, सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे सामने होतील.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारत 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. ही पाच सामन्यांची कसोटी मालिका जागतिक क्रिकेटमधील सर्वात अपेक्षित घटनांपैकी एक आहे. मालिकेतील सामने ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. संपूर्ण मालिका अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
इंग्लंड येणार भारत दौऱ्यावर…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ पुन्हा मायदेश परतणार आहे. तर इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येईल. यादरम्यान दोन्ही संघामध्ये पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. त्यानंतर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही आयसीसीची मोठी स्पर्धा खेळायची आहे. ही स्पर्धा पाकिस्तान 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान आयोजित केली जाऊ शकते. हे सामने कराची, रावळपिंडी आणि लाहोरच्या स्टेडियममध्ये आयोजित केले जातील. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. मात्र भारत स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसून यावर बीसीसीआयनं निर्णय घेणे बाकी आहे.
(1) भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी : 19 ते 23 सप्टेंबर 2024, चेन्नई
दुसरी कसोटी : 27 सप्टेंबर ते 1 आॅक्टोबर 2024, कानपूर
पहिला टी20 सामना : 6 ऑक्टोबर 2024, ग्वाल्हेर
दुसरा टी20 सामना : 9 ऑक्टोबर 2024, नवी दिल्ली
तिसरा टी20 सामना : 12 ऑक्टोबर 2024, हैदराबाद
(2) न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी : 16 ते 20 ऑक्टोबर 2024, बेंगळुरू
दुसरी कसोटी : 24 ते 28 ऑक्टोबर 2024, पुणे
तिसरी कसोटी : 1 ते 5 नोव्हेंबर 2024, मुंबई
(3) द. आफ्रिका विरूध्दच्या मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिला टी-20 सामना : 8 नोव्हेंबर 2024, डर्बन
दुसरा टी-20 सामना : 11 नोव्हेंबर 2024, गकबरहा
तिसरा टी-20 सामना : 13 नोव्हेंबर 2024, सेंच्युरियन
चौथा टी-20 सामना : 15 नोव्हेंबर 2024, जोहान्सबर्ग
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफीमध्ये रोहित-कोहली का खेळणार नाहीत? जय शहांनी सांगितले खरे कारण…
(4) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी : 22 नोव्हेंबर 2024, पर्थ
दुसरी कसोटी : 6 डिसेंबर 2024, ॲडलेड
तिसरी कसोटी : 14 डिसेंबर 2024, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26 डिसेंबर 2024, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3 जानेवारी 2025, सिडनी
(5) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचे पूर्ण वेळापत्रक….
पहिला टी20 सामना : 22 जानेवारी 2025, कोलकाता
दुसरा टी20 सामना : 25 जानेवारी 2025, चेन्नई
तिसरा टी20 सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट
चौथा टी20 सामना : 31 जानेवारी 2025, पुणे
पाचवा टी20 सामना : 2 फेब्रुवारी 2025, मुंबई
पहिला एकदिवसीय सामना : 6 फेब्रुवारी 2025, नागपूर
दुसरा एकदिवसीय सामना : 9 फेब्रुवारी 2025, कटक
तिसरा एकदिवसीय सामना : 12 फेब्रुवारी 2025, अहमदाबाद